Onion Rate : निर्यातबंदी उठवताच कांद्याचे भाव वधारले; प्रति क्विंटलमागे 500 रुपयांनी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असतानाच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Rate) उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव आज (ता.4) तब्बल 500 रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव-विंचूर बाजार समितीत आज शुक्रवारच्या तुलनेत कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे भाव (Onion Rate) प्रतिक्विंटलमागे 500 रुपयांनी वधारले आहेत.

भाव आणखीनच वधारणार (Onion Rate Export Ban Lifted)

केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. परंतु हा निर्णय आधी घेतला असता, तर शेतकऱ्यांना यापेक्षाही अधिक फायदा झाला असता, असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला माल विकून टाकलेला असून, आता बाजारात येणारा कांदा अल्प प्रमाणात येत आहे. सध्या कांदा चाळीत साठवण्याचे काम सुरु असल्यामुळे काही व्यापारी आणि शेतकरी कांद्याचा स्टॉक करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याला आणखीच चांगला भाव (Onion Rate) मिळू शकतो, असेही एका कांदा व्यापाऱ्याने म्हटले आहे.

भावाची कसर भरून निघणार

दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कांद्याचे भाव आणखीच वाढले, तर शेतकरी स्टॉक केलेला कांदा बाजारात आणतील. त्यामुळे मागच्या वेळी कवडीमोल दराने मिळालेल्या भावाची यात थोडीफार कसर भरून निघेल, असे काही कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे. दरम्यान, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता.

कांद्याचे भाव झपाट्याने घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र, आता केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवून 1 मॅट्रिक टन कांद्यासाठी 550 डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!