Onion Sale By Central Government : सरकारकडून 25 रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून, परिणामस्वरूप मागील 4 ते 5 दिवसात कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. त्यातच आता सरकारने सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असून, राखीव साठ्यातील कांद्याची 25 रुपये दराने किरकोळ विक्री सरकारकडून सुरू (Onion Sale By Central Government) करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने NCCF तर्फे संचालित किरकोळ विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅन, नाफेड, केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही विक्री सुरु केली आहे.

देशांतर्गत ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता आणि किफायतशीरपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सरकारने २९ ऑक्टोबर २०२३ पासून कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० अमेरिकी डॉलर्स प्रती मेट्रिक टन ठेवणे, राखीव साठ्यामध्ये २ लाख टन कांद्याची भर, ५.०६ लाख टन कांद्याची याआधीच केलेली खरेदी आणि किरकोळ विक्री, ई-नाम लिलाव तसेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून घाऊक बाजारात सुरु केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री असे उपक्रम याआधीच राबवण्यास सुरुवात केली आहे.

25 रुपये प्रति किलो कांदा – Onion Sale By Central Government

नाफेडने २ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या २१ राज्यांतील ५५ शहरांमध्ये दुकाने आणि मोबाईल व्हॅन यांचा समावेश असलेली ३२९ किरकोळ विक्री केंद्रे उभारली आहे. त्याचप्रमाणे, NCCF ने २० राज्यांतील ५४ शहरांमध्ये ४५७ किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली आहेत. त्याच धर्तीवर, केंद्रीय भांडारतर्फे देखील ३ नोव्हेंबर २०२३ पासून त्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहेत. तर हैदराबाद कृषी सहकारी संघ तेलंगणा आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये असेच उपक्रम राबवत आहे. तर दिल्ली-एनसीआरमधील मदर डेअरीच्या सफल विक्री केंद्रावरही 25 रुपये प्रति किलो दराने कांदा (Onion Sale By Central Government) उपलब्ध होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने चालू वर्षासाठी पाच लाख टन कांद्याचा बफर स्टॉक राखला असून, अतिरिक्त दोन लाख टन कांद्याचा बफर तयार करण्याची योजना आखली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले असले तरी किरकोळ बाजारावर याचा अजून कोणताही प्रभाव दिसून आला नाही.

error: Content is protected !!