Onion Seeds : यावर्षी कांदा बियाण्याचे उत्पादन घटण्याची शक्यता? ‘ही’ आहेत कारणे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांदा बियाणे (Onion Seeds) खुडणीची कामे सुरु आहे. प्रामुख्याने डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागवड केलेली कांदे (डोंगळे) सध्या खुडणीला आले आहेत. मात्र, यंदा कांदा बियाणे निर्मिती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षी साधारणपणे या दिवसात प्रत्येक शेतकऱ्याकडे कांदा बियाण्यासाठीचे डोंगळे पाहायला मिळतात. मात्र, यंदा पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी डोंगळे लावलेले नाहीत, तसेच यंदा कांदा बीजोत्पादनासाठी (Onion Seeds) परागीभवनात देखील अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

शेतकरी अन्य पिकांकडे वळण्याची शक्यता (Onion Seeds)

संपूर्ण वर्षभर कांद्याला चांगला दर मिळाला नाही. संपूर्ण वर्षच कांदा उत्पादकांसाठी तोट्यात गेले. अर्थात यावर्षी बरेच शेतकरी कांदा बियाण्याच्या उत्पादनात कपात करून, अन्य पिकांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा बियाण्याचे उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यात अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्यावर त्याची लागवड करावी लागते. ज्यामुळे पुढील वर्षी कांद्याला भाव राहील की नाही? याची काही शाश्वती नसते. परिणामी, शेतकरी कांद्याऐवजी दुसऱ्या पिकांकडे वळण्याची शक्यता अधिक आहे.

अल्प पावसामुळे उत्पादन घटणार

राज्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाला. ज्याचा थेट परिणाम खरिपातील कांदा उत्पादनावर झाला. अशातच यंदा राज्यातील बऱ्याच भागांमध्ये दिवाळीपासूनच पाण्याची कमतरता होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना कांदा बियाण्याच्या निर्मितीसाठी अर्थात डोंगळे लावण्यासाठी पाण्याची कमतरता जाणवली. तर संपूर्ण रब्बी हंगामात अवकाळी पाऊस कायम होता. 15-15 दिवसांमध्ये ढगाळ हवामान कायम राहिल्याने, रोगांच्या प्रादुर्भावामुळे कांदा बीज उत्पादनावर परिणाम झाला आहे.

परागीभवनावरही विपरीत परिणाम

विशेष म्हणजे कांदा बियाणे निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मधमाशी. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने मधमाशांचा अधिवास प्रामुख्याने एकाच ठिकाणी अधिक पाणी उपलब्ध असेल किंवा मग बऱ्याच प्रमाणात हिरवळ आणि नैसर्गिक फुले मकरंद असेल अशा ठिकाणी असतो. मात्र, सध्या कांदा उत्पादक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने, अशी कोणतीही नैसर्गिक परिस्थिती कांदा बीज उत्पादनासाठी उपलब्ध नाही. मधमाशांच्या माध्यमातून परागीभवनावर यंदा विपरीत परिणाम झालेला आहे. ज्यामुळे यावर्षी या तीन कारणांमुळे कांदा बीज उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!