Onion Smuggling : टोमॅटोच्या आडून कांद्याची तस्करी; मुंबईत कंटेनरसह 82.93 मेट्रिक टन कांदा जप्त!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाहीये. तर दुसरीकडे मात्र कांदा तस्करी (Onion Smuggling) जोरात सुरु असल्याचे समोर आले आहे. मोठ्या कंटेनरमधून टोमॅटोच्या आडून परदेशात कांदा तस्करी होत असल्याची घटना मुंबई येथे समोर आली आहे. साधारणपणे 82.93 मेट्रिक टन कांदा या कंटेनरमधून संयुक्त अरब अमिराती या देशात पाठवला जाणार होता. मात्र, त्याआधीच मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील सीमा शुल्क विभागाने या कंटेनरवर (Onion Smuggling) कारवाई केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार? (Onion Smuggling In Maharashtra)

केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी लागू केली. ज्यामुळे शेतकऱ्यांना कष्ट करूनही त्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये. मात्र, शेतकऱ्यांचा कांदा कमी दरात विकला जात असताना, कांदा तस्कर मात्र त्यातून चांगली मलाई खात आहे. अर्थात कष्ट करणाऱ्याला दमडीही मिळेना आणि दुसरा मात्र त्याच्या कष्टावर मलाई खातोय. असा काहीसा प्रकार कांदा निर्यातबंदीमुळे तस्करीतुन पाहायला मिळतोय.

सापळा रचत कारवाई

दरम्यान, हा कंटेनर नाशिकमधील दोन निर्यातदारांकडून संयुक्त अरब अमिराती या देशात पाठवला जाणार होता. मात्र, नागपूरच्या सीमाशुल्क विभागाला याबाबत आधीच माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत नागपूरचे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी मुंबईला पोहचले, त्यांच्याकडून मुंबईत येथे या कंटेनरची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी कंटेनरमध्ये मागील बाजूस टोमॅटोची खोकी तर कंटेनरच्या शेवट पुढील भागात खोक्यांच्या आडून, कांद्याच्या गोण्या लपवण्यात आल्या होत्या. या कंटेनरमध्ये या गोण्यांमध्ये एकूण 82.93 मेट्रिक टन कांदा असल्याची नोंद सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. हा संपूर्ण कांदा जप्त करण्यात आला आहे.

यापूर्वीही ८ डिसेंबर २०२३ रोजी कांदा निर्यातबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर भारतातून छुप्या मार्गाने नेपाळमध्ये कांदा पाठवला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यावेळी नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी संबंधित कांदा तस्करांना अवैध मार्गाने भारतातून कांदा नेपाळमध्ये पाठवताना कांद्यासहित ताब्यात घेतले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा या घटनेनंतर कांदा निर्यातबंदीमुळे उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, तस्करांचे चांगलेच फावले असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!