हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने निर्यातबंदी केल्यानंतर नेपाळमध्येही कांदा दरात मोठी वाढ होती. याचाच फायदा घेत भारतातून छुप्या मार्गाने (Onion Smuggling) नेपाळमध्ये कांदा पाठवला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दोन वेळा कांदा तस्करांना अवैध मार्गाने कांदा आयात करताना कांद्यासहित ताब्यात घेतले आहे. यामध्ये मागील मंगळवारी आणि शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कांद्याला दर मिळत नसताना कांदा तस्करांची (Onion Smuggling) मात्र चांदी होताना दिसून येत आहे.
कांदा तस्करी उघड (Onion Smuggling On Nepal Border)
आघाडीच्या नेपाळी वृत्तपत्रातील माहितीनुसार, नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात मंगळवारी (ता.9) भारत-नेपाळ सीमेवर 28 गोण्यांमधील 1,700 किलो कांदा तर शुक्रवारी (ता.12) जवळपास 17 क्विंटल 730 किलो कांदा तस्करांकडून ताब्यात घेतला आहे. परिणामी कांदा दरवाढीचा फायदा तस्करांसाठी हा मोठा कमाईचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वाढलेले कांदा दर हे सध्या सामान्य स्थितीत आहे. इतकेच नाही तर नेपाळमधील सर्वात मोठे कालीमाटी भाजीपाला मार्केट येथे रोज 60-70 टन इतक्या कांद्याची आवक होत आहे. ही आवक कांदा तस्करीमुळेच वाढल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
उत्पादकांना कष्टाचा दाम मिळेना
भारतात मागील वर्षीच्या खरीप हंगामात टोमॅटोचे भाव वाढलेले होते. त्या काळात नेपाळच्या सीमेलगतच्या भागात नेपाळहून स्वस्तात टोमॅटो येत होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नेपाळी टोमॅटो जप्त करण्यात आला होता. आता कांद्याच्या बाबतीतही तोच कित्ता गिरवला जात असल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये कांदा टंचाई झाल्यानंतर तिथे आता भारतीय कांदा छुप्या मार्गाने जात आहे. नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात केलेल्या दोन कारवायांमधून ते सिद्धही झाले आहे. त्यामुळे एका बाजूला शेतात राबून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला कष्टाचा मोबदला मिळत नसताना, त्याच्या घामाच्या उत्पादनावर तस्कर मात्र चांगलीच कमाई करत आहे.