Organic Farming : 4 वर्षात देशातील सेंद्रिय शेतीचे क्षेत्र दुपटीने वाढले; 64 लाख हेक्टरवर लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशातच आता फेब्रुवारी 2024 पर्यंत देशातील सेंद्रिय शेतीचे क्षेत्र 64,04,113 हेक्टरपर्यंत वाढले असल्याचे समोर आले आहे. जी 2019-2020 मध्ये देशभरात 29,41,678 हेक्टरवर नोंदवली गेली होती. अर्थात मागील चार वर्षांमध्ये देशातील सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ नोंदवली गेली आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

सेंद्रिय शेतीची वर्षनिहाय आकडेवारी (Organic Farming In India)

राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्राच्या आकडेवारीनुसार, 20 वर्षांपूर्वी 2003-04 मध्ये देशात केवळ 76,000 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय पिकांची लागवड (Organic Farming) केली जात होती. ज्यात 2009-10 मध्ये वाढ होऊन, ते 10,85,648 हेक्टर इतके नोंदवले गेले होते. तर सध्याच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019-2020 मध्ये देशातील सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र हे 29,41,678 हेक्टर इतके नोंदवले गेले. ज्यात 2020-21 मध्ये 38,08,771 हेक्टरपर्यंत वाढ झाली. तर 2021-22 मध्ये देशातील सेंद्रिय शेतीचे क्षेत्र हे 59,12,414 हेक्टर इतके नोंदवले गेले होते. ज्यात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत 64,04,113 हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. अर्थात 2019-2020 या मागील चार वर्षांच्या तुलनेत सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ नोंदवली गेली आहे.

उत्पादन घटते का?

बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत असते की सेंद्रिय शेती (Organic Farming) केल्यामुळे शेतीतील उत्पादनात घट होते. अर्थात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढले तर भारतात अन्नधान्याची कमतरता जाणवू शकते. मात्र, केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांच्या मनातील ही शंका फेटाळून लावली आहे. सेंद्रिय शेतीमुळे पिकांच्या उत्पादनात घट न होता गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. दरम्यान, सेंद्रिय शेती करण्यात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र, सिक्कीम ही राज्य आघाडीवर आहेत.

प्रमाणपत्र आवश्यक असते

शेतकऱ्यांना वाटते की आपण रासायनिक कीटकनाशके आणिरासायनिक खते न वापरता, शेती करतोय म्हणजे आपला उत्पादित शेतमाल सेंद्रिय असेल. मात्र असे नसते. सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतमालाची विक्री तेव्हाच होते. जेव्हा त्यांच्याकडे प्रमाणपत्र असते. त्यामुळे सेंद्रिय शेती करताना हे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते. दरम्यान, सेंद्रिय शेती करणारे असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. ज्यामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!