Organic Liquid Bio Fertilizer Jivamrut: सेंद्रीय द्रवरूप जैविक खत – जीवामृत पिकांसाठी आहे अमृत  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू (Organic Liquid Bio Fertilizer Jivamrut) पिकांच्या वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. सूक्ष्म-जीवाणू जमिनीतील अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण करून ते पिकांना उपलब्ध करून देतात, खताची कार्यक्षमता वाढवतात त्यामुळे खताचा कमी प्रमाणात वापर होतो, पिकांच्या उत्पादनातही वाढ होते.  

जमीन आणि पिकांसाठी उपयुक्त असणार्‍या या सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढविण्यासाठी जीवामृत या सेंद्रिय द्रवरूप जैविक खताचा (Organic Liquid Bio Fertilizer Jivamrut) वापर फायदेशीर ठरतो. आजच्या लेखात जीवामृताचे फायदे, ते तयार करण्याची पद्धती आणि वापर याविषयी जाणून घेऊ या.  

जीवामृत वापरण्याचे फायदे ( Jivamrut Benefits)

जीवामृत हे नावाप्रमाणेच पिकांसाठी आणि जमिनीतील जिवाणूंसाठी अमृत आहे. जीवामृतामुळे

  1. जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या पटीने वाढते, ही संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र मोठ्या प्रमाणात शोषून घेतल्या जाते त्यामुळे पि‍काला फायदा होतो.
  2. नत्र व इतर पूरक अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पिकांची शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.    
  3. गांडुळांची संख्या नैसर्गिकपणे वाढते, त्यामुळे सेंद्रीय कर्ब व पर्यायाने जमिनीची जलधारणा क्षमता सुद्धा वाढते.
  4. पांढर्‍या मुळ्यांची संख्या व आकार वाढविते, त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य पिकांस सहज उपलब्ध होतात
  5. कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते, रासायनिक खताचा वापर कमी होऊन खर्चात बचत होते.
  6. जिवामृताच्या वापराने शेतातील भाजीपाला व फळांची प्रत व चव सुधारते, व त्यांची साठवण क्षमता चांगली राहते.

जीवामृत कसे तयार करायचे? (Jivamrut Preperation)

लागणारे साहित्य: 200 लीटर क्षमतेचे प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंटची टाकी, 10 किलो देशी गायीचे ताजे शेण, 10 किलो देशी गायीचे गोमूत्र, 2 किलो काळा गावरान गूळ, 2 किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ (बेसन), 2 किलो वडाच्या झाडाखालची किंवा शेताच्या बांधावरील जीवाणूयुक्त माती किंवा 100 ग्रॅम उपलब्ध असलेले जीवाणू संवर्धक

कृती: जीवामृत तयार करण्यासाठी 200 लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरल किंवा सिमेंट टाकीमध्ये 170 लीटर स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात 10 किलो शेण, 10 लीटर गोमूत्र, 2 किलो काळा गूळ, 2 किलो बेसन, 2 किलो जीवाणू माती किंवा 100 ग्रॅम उपलब्ध जीवाणू संवर्धके मिसळावी.

डावीकडून उजवीकडे दररोज 10 ते 15 मिनिटे दोन-तीन वेळा ढवळावे. 7 दिवसांत पिकांना देण्यासाठी जीवामृत तयार होते. उत्कृष्ट जीवामृत हे तांबडा ते काळसर रंगाचे असून सामू आम्लधर्मी असतो. यात  नत्र, स्फुरद व पालाश सोबतच इतरही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.  

एका एकराला 200 लीटर जीवामृत पुरेसे होते.शेताचे जास्त क्षेत्र असल्यास बॅरलची संख्या वाढवावी. किंवा हजार लीटर क्षमतेच्या टाक्या मध्ये वरील प्रमाण पाचपट करून मिश्रण तयार करावे. गोमूत्राची उपलब्धता जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे. तयार केलेले जीवामृत 30 दिवसांच्या आत वापरावे.

जीवामृत वापरण्याची पद्धत (Jivamrut Use)

जीवामृतचा (Organic Liquid Bio Fertilizer Jivamrut) वापर करताना जमिनीत ओलावा असल्यास फायदेशीर असते.

  • जमिनीत ओलावा असताना कडुनिंबाच्या डहाळीने किंवा साध्या फवारणी यंत्राने पिकांच्या ओळीत जमिनीवर शिंपडावे.
  • बी टोकून पेरलेल्या पिकांना (उदा. कापूस, मिरची, केळी, पपई इ.) बुडाशी भांड्याने झाडाच्या आकारमानाप्रमाणे 250 ते 500 मि.ली. या प्रमाणात प्रति झाड जीवामृत टाकावे.
  • पिकांना ओलीत देताना मुख्य चारीत बारीक धार (पाईप किंवा भांड्याने) धरावी. हे पाणी पुढे सरीत जाऊन पिकांच्या मुळापाशी जाते.
  •  सर्व घटकांचे प्रमाण वाढवून पातळ कणकेसारखे तयार केलेले जीवामृत गोणपाटात भरून पाण्याच्या पाईपच्या तोंडाखाली ठेवल्यास, पाण्यासोबत शेतात पसरते.
  • ठिबक सिंचन पद्धतीने जीवामृत देताना ते अगोदर गाळून घ्यावे, अन्यथा लॅटरल व इमिटरमध्ये जीवामृत अडकून ते बंद होऊ शकतात.
  • जीवामृत (Organic Liquid Bio Fertilizer Jivamrut) वस्त्रगाळ करून त्याची फवारणीही करता येते.
error: Content is protected !!