Organic Pesticides : कीटकनाशकांच्या खर्चाला वैतागलाय? असे बनवा घरच्या घरी जैविक कीटकनाशक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी आपल्या पिकांवरील रोगांचे नियंत्रण (Organic Pesticides) करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. मात्र कीटकनाकांच्या आणि रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत तर खराब होतोच आहे. याशिवाय कीटकनाशकांच्या भरमसाठ किमतींमुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च देखील होत आहे. त्यामुळे आज आपण घरच्या घरी जैविक पद्धतीने कीटकनाशक (Organic Pesticides) कसे तयार केले जाते? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सर्व पिकांसांठी उपयुक्त (Organic Pesticides For Farmers)

आज आम्ही तुम्हाला जैविक पद्धतीने कीटकनाशक (Organic Pesticides) तयार करण्याच्या ज्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत. ती पद्धत देशातील एका नामांकित कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकांनी समोर आणली आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार जैविक पद्धतीने तयार केलेले ‘दशपर्णी अर्क’ कीटकनाशक हे सर्वच पिकांसांठी खूप उपयुक्त असते. पिकावरील रस शोषक, पाने कुर्तडणारी, पिकांची देठे खाणारी अशा सर्वच कीटकांवर हे जैविक कीटकनाशक प्रभावी मानले गेले आहे. या जैविक कीटकनाशकाच्या वापरामुळे पिकाला कोणतेही नुकसान होत नसल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

कसे तयार कराल जैविक कीटकनाशक?

कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, दशपर्णी अर्क हे जैविक कीटकनाशक बनवण्यासाठी एका ड्रममध्ये २०० लिटर पाणी घ्यावे. त्यात कडुनिंब, धोतरा, रुई, कण्हेर, एरंड, बेल, आंबा, पपई, लिंबू आणि पेरू या झाडांची प्रत्येकी २ किलो पाने टाकावीत. त्यानंतर 50 ग्रॅम तंबाखू, 500 ग्रॅम आले, 500 ग्रॅम लसूण, 500 ग्रॅम तिखट हिरव्या मिरच्या, 10 किलो देशाची गाईचे शेण, 500 ग्रॅम हळद आणि 10 लीटर गाईचे गोमूत्र टाकून सर्व मिश्रण करावे. या सर्व वस्तू २०० लिटर पाण्यात चागंल्या ढवळून घ्यायच्या. त्यानंतर ड्रमचे तोंड कापडाने चांगले घट्ट बांधून सावलीत ठेवून द्यावे. जवळपास 30 ते 35 दिवसात तुमचे जैविक कीटकनाशक तयार झालेले असेल. या कीटकनाशकाला जितके जास्त दिवस ठेवाल तितका त्याचा अधिक रिझल्ट मिळतो.

किती प्रमाणात वापरायचे?

हे जैविक कीटकनाशक तुम्ही पिकांच्या सुरुवातीच्या काळात आधीच तयार करून मोठ्या चार-पाच ड्रममध्ये भरून ठेवू शकता. हे कीटकनाशक एकदा तयार केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत वापरले जाऊ शकते. पिकांना फवारणीची जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही हे जैविक कीटकनाशक 2 ते 2.5 लिटर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात. हे जैविक कीटकनाशक रस शोषक किडी, सुरवंट तसेच सर्व लहान-मोठ्या कीटकांचा समूळ नाश करते.

कोणत्या पिकांसाठी वापराल?

सहा महिन्यापर्यंत वापरले जात असल्याने हे जैविक कीटकनाशक रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. याशिवाय फवारणीच्या वेळी मानवाला याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. या कीटकनाशकाचा वापर करणे म्हणजे जैविक पद्धतीने पिकाचे उत्पादन घेण्यासारखे आहे. या दशपर्णी अर्क जैविक कीटकनाशकाचा ऊस, धान, गहू, बटाटा या प्रमुख पिकांसह सर्वच भाजीपाला पिकांसाठी केला जाऊ शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण पिकांचे उत्पादन घेण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!