Paddy Farming : ‘या’ पिकासाठी सरकारकडून मिळणार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून धान उत्पादक (Paddy Farming) शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात (Paddy Farming) बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

धान हे भंडारा जिल्ह्यासह विदर्भ पट्ट्यातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जलदगतीने धानाची खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय सरकारकडून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पीक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

‘देशातील पहिले राज्य’ (Paddy Farming Bonus Announced CM Eknath Shinde)

राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा भरता यावा. यासाठी राज्य सरकारकडून केवळ एक रुपया भरून पीक विम्याचा लाभ देण्याची योजना सुरु केली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला या योजनेमुळे संरक्षण मिळाले आहे. याशिवाय पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक सहा हजार तर राज्य सरकारच्या वतीने सहा हजार असे एकूण वार्षिक 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. अशी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, आपत्ती काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्यासाठी सरकारी नियम बाजू ठेऊन मदत केली जात आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत करण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे होणारे नुकसान हे देखील नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणले गेले आहे. असेही मुख्यमंत्री यावेळी सांगितले.

error: Content is protected !!