Paddy Seeds : ‘रत्नागिरी 8’ धानाचे वाण अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीला, वाचा.. वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे. तसतसे शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन सुरु केले आहे तर बियाणे (Paddy Seeds) व्यवसायाने बीज निर्मितीचा वेग पकडला आहे. अशातच सध्या राज्यात काही भागांमध्ये शेतकरी धान रोपांच्या तयारीसाठी उत्कृष्ट धान बियाण्याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ‘रत्नागिरी 8’ (सुवर्णा-मसुरा) हे धानाचे वाण शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. यंदा विद्यापीठाने या वाणाच्या बियाण्याची (Paddy Seeds) गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विक्री करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

काय आहेत ‘या’ वाणाची वैशिष्ट्ये? (Paddy Seeds Ratnagiri 8 Rice Variety)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘रत्नागिरी 8’ हे वाण (Paddy Seeds) वर्ष 2019 मध्ये विकसित केले आहे. हे वाण प्रामुख्याने 135 ते 138 दिवसांमध्ये परिपक्व होते. या वाणाच्या दाण्यांचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. या धानाच्या पिकाची उंची तीन ते साडेतीन फूट इतकी असते. ‘रत्नागिरी आठ’ या वाणाच्या मदतीने शेतकऱ्यांना हेक्टरी 55 ते 60 क्विंटल इतके उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे या प्रजातिच्या धानावर करपा, कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. विद्यापीठाने एकूण सहा राज्यांसाठी या वाणाची शिफारस केलेली आहे.

अल्पावधीत ठरले लोकप्रिय

मागील केवळ 5 वर्षांमध्ये धानाचे ‘रत्नागिरी आठ’ हे वाण राज्यातच नव्हे तर अन्य सहा राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांच्या पसंतीस पडले आहे. या वाणाला प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधून मोठी मागणी आहे. तर राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या सर्वच जिल्ह्यांमध्ये हे वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या 60 टन या बियाणे विक्रीच्या तुलनेत 150 टन बियाणे विक्रीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. असे विद्यापीठाने म्हटले आहे.

‘रत्नागिरी 8’ हे धानाचे वाण ‘सुवर्णा’ या धानाच्या प्रजातीला पर्याय म्हणून विकसित करण्यात आले आहे. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्याची या वाणाची क्षमता असून, ते पावसात खंड पडला. किंवा मग पाऊस उशिरा पडला. तरीही या वाणाला तितकासा फटका बसत नाही. असे विद्यापीठाने म्हटले आहे.

error: Content is protected !!