हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात शेतकरी पपईची लागवड (Papaya Farming) करतात. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात पपई लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पपईचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे फायदे देखील आहेत. ज्यामुळे बाजारात तिला नेहमीच चांगली मागणी राहून, दरही चांगला मिळतो. मात्र आता पपईचे निघणारे दूधही विशेष महाग असते. हे दूध सौंदर्य प्रसाधने आणि मेडिकल औषधांमध्ये वापरले जाते. त्यामुळे तुम्ही पपईची शेती करत असाल किंवा पपईची लागवड कारण्याचा विचार करत असाल तर, पपईच्या या दुधापासून (Papaya Farming) देखील मोठी कमाई करू शकतात.
किती मिळतो दर? (Papaya Farming Milk 150 Rupees Per Litre)
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या – आयसीएआर (पुसा, नवी दिल्ली) माध्यमातून पपईच्या दुधाचा (Papaya Farming) वापर करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. त्यानुसार उत्तर भारतीय राज्यांमध्ये पपईची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. शेतकऱ्यांना याबाबत माहिती देऊन, पपईच्या दुधाची महती सांगितली जात आहे. या दुधाला प्रामुख्याने पपेन म्हटले जात असल्याचे आयसीएआरने म्हटले आहे. पपईचे हे दूध साधारणपणे १५० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. त्यामुळे आता पपई उत्पादनासह शेतकरी पपईच्या दुधापासूनही अतिरिक्त कमाई करू शकणार आहे.
हेक्टरी किती मिळते दूध?
पपईची लागवड करायची म्हटले तर साधारणपणे लागवडीसाठी हेक्टरी कमीत कमी तीन लाख रुपये खर्च येतो. त्यातून बाजारभाव चांगले असल्यास आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तर एका हेक्टरवरील पपईच्या झाडांपासून साधारपणे २५० ते ३०० लिटर दूध जमा केले जाऊ शकते. ज्याला सौंदर्य प्रसाधने कंपन्यांकडून बाजारात 150 रुपये प्रति लिटरचा दर मिळतो, त्यामुळे आता शेतकरी पपई लागवडीतून डबल उत्पन्न मिळवू शकणार आहे.
कसे काढले जाते दूध?
ज्यावेळी पपईला योग्य दर मिळत नसेल त्यावेळी हा पर्याय शेतकऱ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे. पपईपासून दूध काढण्यासाठी साधारणपणे तीन महिन्याचे फळ झाल्यानंतर त्यास वरतून ३ मीमी इतकी नॉर्मल अशा तीन रेषा मारल्या जातात. यापेक्षा जास्त खोल रेषा मारू नये असे आयसीएआरकडून सांगितले जाते. कारण फळ विक्रीसाठी जास्त खोल रेषा धोकादायक ठरू शकतात. या तीन रेषांच्या माध्यमातून एका संपूर्ण फळातून दूध काढले जाऊ शकते. त्यानंतर पपई पिकल्यानंतर तिची विक्रीसाठी काढणी केली जाऊ शकते. पपई तुम्ही प्रामुख्याने फळांच्या रसाच्या क्षेत्रात असलेल्या कंपनींना विकू शकतात.
कुठे होतो वापर?
सध्यस्थितीत आंध्रप्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांमधील शेतकरी पपईपासून दूध उत्पादन करत आहे. पपईचे दूध प्रामुख्याने पोटाचा आजार असलेल्या अल्सरवरील औषध तयार करण्यासाठी रामबाण उपाय म्हणून वापरले जाते. याशिवाय जुलाब आणि यकृत रोगांवर उपचार करण्यासाठीच्या औषधांमध्येही पपईचे दूध वापरले जाते. तसेच सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये याचा वापर होतो. आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या देखील या दुधाची मोठया प्रमाणात खरेदी करतात.