Papaya Fungal Diseases: जाणून घ्या, पपईवरील बुरशीजन्य रोगांवर एकात्मिक नियंत्रण उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई (Papaya Fungal Diseases) हे उष्णकटिबंधीय हवामानात मोठ्या प्रमाणावर पिकवले जाणारे सर्वात स्वादिष्ट फळ आहे. या फळाची त्वचा अतिशय पातळ असते त्यामुळे अयोग्य  हाताळणीमुळे हे पीक बुरशी आणि बॅक्टेरियामुळे विविध रोगांना बळी पडते. जाणून घेऊ या पपईवरील बुरशीजन्य रोग (Papaya Fungal Diseases) आणि त्यावर नियंत्रण उपाय.

  • करपा/अँथ्रॅक्नोज (Anthracnose)                                                                       या रोगाचा (Papaya Fungal Diseases) प्रसार प्रादुर्भावीत फळे, वारा, पावसाचे पाणी यामुळे होतो. या रोगाची सुरुवात हिरव्या, न पिकलेल्या फळांवर लहान चट्टे स्वरुपात होते. व नंतर मोठ्या फळांवर होते. या बुरशीजन्य रोगामुळे पिकलेली फळे सडतात, फळांच्या पृष्ठभागावर गोलाकार, तपकिरी, सपाट किंवा खोलगट चट्टे पडतात.

नियंत्रण उपाय (Papaya Disease Control)

  • हिवाळ्यात दक्षिणेकडील सूर्य किरणांचे चटके बसून या रोगाचा प्रादुर्भाव होतो. फळे मऊ बनतात. म्हणून फळे तपकिरी रंगाच्या कागदाने झाकावीत किंवा फळाभोवती पॉलिथीन कागद गुंडाळावा.
  • रोगाची बाधा झालेली फळे व पानांचे देठ काढून टाकावेत.
  • 45 दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिम 0.1% फवारणी किंवा क्लोरोथॅलोनिल 0.2% 10 ते 15 दिवसांच्या अंतराने किंवा 10 दिवसांच्या अंतराने थायोफॅनेट-मिथाइल 0.1% किंवा मॅन्कोझेब 0.2% प्रति लिटर पाणी फवारणी या रोगाचे नियंत्रण करतात.
  • बेझिलिसो थियोसाइनेटची धूरी काढणीनंतरचे ठिपके आणि कुजणे नियंत्रित करते.

  • पायकूज किंवा बुंधा सडणे (Foot Rot / Collar Rot)                                                         हा बुरशीजन्य रोग (Papaya Fungal Diseases) ऑगस्ट, सप्टेंबर, आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यांत आढळतो. विशेषतः पाण्याचा चांगला निचरा न होणार्‍या जमिनीतील झाडांवर आढळतो. जमिनीच्या पृष्ठभागालगत झाडाच्या बुंध्याच्या सालीवर पाणी शोषलेले चट्टे दिसतात. झाडाच्या शेंड्यावरील पाने खाली वाकतात, सुकतात, पिवळी पडतात आणि अकाली गळून पडतात

नियंत्रण उपाय

  • लागवडीपूर्वी रोपवाटिका उन्हात चांगली तापू द्यावी.
  • 3 ग्रॅम थायरम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • रोपे लावणीच्या वेळी 200 ग्रॅम शेणखतात 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळावी.
  • पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदावे, झाडाला दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी द्यावे.
  • शेतात खोल आंतरमशागत करू नये, झाडाच्या बुंध्याभोवती मातीची भर घालावी.
  • रोगाची बाधा झालेल्या खोडावरील भाग खरडून काढून तेथे बोर्डो पेस्ट लावावी.
  • 1 टक्का बोर्डो मिश्रण किंवा 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम कॉपर ऑक्सीफ्लोराईड मिसळून त्या द्रावणाची झाडाच्या बुंध्याजवळ फवारणी करावी.
  • क्लोरोथॉलोनील किंवा मेटॅलॅक्झोन 2 ग्रॅम/लिटर पाणी रोगग्रस्त झाडाच्या बुडाशी ओतावे.

  • काळे ठिपके (Black Spot)                                                              हा रोग सरकोस्पोरा या बुरशीमुळे (Papaya Fungal Diseases) होतो. पानांवर करड्या तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. जास्त संक्रमण असल्यास पपईची रोगग्रस्त पाने पिवळी पडतात व सुकतात, फळांवर देखील ठिपके दिसतात.

नियंत्रण उपाय

  • ठिपके दिसून येताच डायथेन एम 45, किंवा कॅप्टन, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड यापैकी एकाची 2 ग्रॅम/लिटर प्रति लिटर पाणी याप्रमाणे 10 दिवसांच्या अंतराने दोन वेळेस फवारणी घ्यावी.

  • भुरी (Powdery Mildew)                                                                     या बुरशीजन्य रोगाचा प्रसार कमी तापमान व जात दमटपणा यामुळे होतो. बुरशी पानांच्या खालील बाजूस वाढते. पानांच्या खालील बाजूस पांढ-या रंगाची भुकटी दिसून येते. प्रारंभिक अवस्थेत पानांच्या वरील बाजूने पिवळसर किंवा हलक्या हिरव्या रंगाचे ठिपके दिसून येतात. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास खोडावर देखिल पांढ-या रंगाची बुरशी दिसून येते.

नियंत्रण उपाय

  • रोग प्रतिबंधक बियाण्यांचा वापर करावा.
  • रोप लागवड करताना रोपात जास्त अंतर ठेवावे.
  • रोपांना सकाळी लवकर पाणी द्यावे, पाणी मुळांशी द्यावे.
  • संतुलित प्रमाणात खत द्यावे, नत्रयुक्त खताचा कमी वापर करावा
  • 500 लिटर पाण्यात 2 किलो पाण्यात मिसळणारे गंधक मिसळून द्रावणाची 15 दिवसांच्या अंतराने पानावर फवारणी करावी.
  • कार्बेन्डाझिम 0.1% किंवा थिओफेनेट-मिथाइल 0.1% प्रति लिटर यांची एक महिन्याच्या अंतराने फवारणी प्रभावी ठरते.
error: Content is protected !!