Papaya Viral Disease: पपईवरील घातक विषाणूजन्य रोगांचे वेळीच करा नियंत्रण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Table of Contents

हॅलो कृषी ऑनलाईन: पपई पिकांवर येणारे सर्वात घातक रोग म्हणजे विषाणूजन्य रोग (Papaya Viral Disease). या रोगामुळे दरवर्षी 40 टक्के पेक्षा जास्त पपईचे उत्पादन प्रभावित होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने विषाणू प्रसार करणाऱ्या किडींमार्फत होतो. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी वापरायच्या कीटकनाशक फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी विषाणूजन्य रोगासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधक उपाय करतात. कारण एकदा हे रोग पिकांवर आले तर यांचे नियंत्रण करणे अवघड असते. जाणून घेऊ पपईवरील या रोगांचे (Papaya Viral Disease) नियंत्रण उपाय.

 

रिंग स्पॉट व्हायरस (Ring Spot Virus)

पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस (PSRV) हा विषाणू या रोगास (Papaya Viral Disease) कारणीभूत आहे. मावा या रसशोषक किडीमुळे या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. सुरवातीला पाने फिकट हिरवी व पिवळसर होतात. पानाच्या शिरा हिरव्या दिसू लागतात. पानाच्या वरील बाजूस शिरा मुरडतात. हिरव्या फळावर अनेक वर्तुळाकार, पाणीदार डाग दिसतात. रोगग्रस्त झाडांची फळे लहान व वेडीवाकडी दिसतात.

एकात्मिक नियंत्रण उपाय (Integrated Disease Management)

Ø  सुरवातीच्या अवस्थेतच रोगग्रस्त झाड मुळासकट उपटून, जाळून टाकावे.

Ø  मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी २० पिवळे चिकट सापळे लावावेत.

Ø  कुंपणावर/बांधावर मका आणि ज्वारी ही पिके लावावीत.

Ø  बागेजवळ काकडीवर्गीय पिकांची लागवड करू नये.

Ø  नत्राची संतुलित प्रमाणात मात्रा द्यावी.

Ø  पालाशयुक्त खतांचा शिफारशीनुसार संतुलित वापर करावा.

Ø  डायमेथोएट 1.5 मिली त्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क (10,000 पीपीएम) 5 मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी.

पाने मुरडणे / लीफ कर्ल (Leaf Curl)                                      या विषाणू रोगाचा (Papaya Viral Disease) प्रसार पांढर्‍या माशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावाने पपईच्या झाडाची पाने मुरडतात, पाने वेडीवाकडी होतात आणि पानांचा आकार लहान राहतो. पाने चामड्यासारखी व ठिसूळ होतात, झाडाची वाढ खुंटते, झाडाला कमी प्रमाणात फुले आणि फळे येतात, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.

एकात्मिक नियंत्रण उपाय

Ø  संक्रमित रोपे आणि झाडे काढून नष्ट करावीत

Ø  पीक फेरपालट करावी

Ø  रोगप्रतिकारक वाणांची (Disease Resistant Variety) लागवड करावी. उदा. सनराईज सोलो, रेड लेडी, ताइनुंग 1, माराडोल रोजा (पूर्ण प्रतिरोधक). CO-2, CO-3, CO-6, कूर्ग हनी ड्यू, पुसा डेलिशियस आणि पुसा ड्वार्फ (मध्यम प्रतिरोधक वाण)

Ø  पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरा, लेडीबग्स आणि लेसविंग्स यासारखे परभक्षी कीटकांचे संवर्धन करा.

Ø  मोनोक्रोटोफॉस @ 5 मिली 10 लिटर पाण्यात किंवा डायमेथोएट @ 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जेणेकरून किडीचे नियंत्रण होऊन शेतातील रोग कमी होईल.  

मोझॅक किंवा केवडा (Papaya Mosaic Virus)                         या विषाणूजन्य रोगाचा (Papaya Viral Disease) प्रसार मावा किडीमुळे होतो. झाडावर नवीन येणारी पालवी पिवळसर दिसते, पानाच्या शिरा हिरव्या दिसून पाने हाताला चरचरीत लागतात. व त्यावर पिवळसर हिरवे चट्टे दिसून येतात. रोगग्रस्त झाडांची फळे आकाराने लहान व वेडीवाकडी होतात, रोगाची तीव्रता जास्त असल्यास पिवळी पाने टोकाकडून वाळत जातात. उत्पादनात लक्षणीय घट होते.

एकात्मिक नियंत्रण उपाय

Ø निंदणी, कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.

Ø आर्द्रता कमी व तापमान जास्त असलेल्या काळात रोपांची लागवड करावी.

Ø पपई भोवती वेलवर्गीय पिके घेऊ नयेत.

Ø पपईच्या बागेत मावा किडीचा शिरकाव टाळण्यासाठी बागेभोवती उंच पीक लावून अडथळा निर्माण करावा

Ø पपईची बाग लावण्यापूर्वी बागेभोवती तीन ते चार महिने अगोदर केळीच्या झाडांचे चार ते पाच ओळी लावल्यास मावा कीड बाहेरून पपईच्या बागेत येण्यास अडथळा निर्माण होतो. व त्यामुळे विषाणूजन्य रोगाचा (Papaya Viral Disease) प्रसार कमी होतो.

Ø मावा किडीचा प्रादुर्भाव दिसताच 10 मिली डायमिथोएट किंवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल व 100 मिली निमअर्क प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी

                                                                                       

error: Content is protected !!