Pea Import : डाळींच्या तुटवड्याचा सरकारला धसका; वाटाणा आयात शुल्क पूर्णतः हटवले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने डाळवर्गीय पिकांच्या तुडवड्याचा धसका घेतला असून, मोठया प्रमाणात डाळींच्या आयातीला (Pea Import) सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच आता सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क (Pea Import) पूर्णतः हटवले आहे. अर्थात दुसऱ्या देशांमधून भारतात येणारा पिवळा वाटाणा कोणतेही शुल्क न भरता भारतात येऊ शकणार आहे. देशातंर्गत पिवळ्या वाटाण्याचा पुरवठा वाढून तूर, उडीद आणि अन्य डाळवर्गीय पिकांच्या दरांमध्ये घट होईल. या उद्देशाने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या परकीय व्यापार महासंचानलयाच्या अधिसूचनेनुसार, पिवळ्या वाटाण्याच्या आयात (Pea Import) धोरणात बदल करण्यात येत असून, यापुढे पिवळा वाटाणा हा निशुल्क आयात संरचनेत असेल असे म्हटले आहे. त्यासाठी 31 मार्च 2024 ही कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता 31 मार्चपर्यंत विना आयात शुल्क पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात भारतात येऊ शकणार आहे. भारतीय डाळी आणि अन्नधान्य संघटनेचे अध्यक्ष बिमल कोठारी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, ‘सरकारच्या या निर्णयामुळे 31 मार्चपर्यंत देशात जवळपास 3 लाख टन वाटाणा दाखल होऊ शकतो. ज्यामुळे अन्य डाळवर्गीय (तूर, उडीद, मूग) पिकांच्या दरांवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.’

दर घसरणीची शक्यता (Pea Import Duties Removed By Government)

कोठारी यांनी पुढे म्हटले आहे की, ‘भारतात सर्वाधिक वाटाणा हा कॅनडामधून येतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कॅनडामध्ये तात्काळ पिवळ्या वाटाण्याच्या दरांमध्ये प्रति टन 75 डॉलरने वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सरकारने वाटाणा आयातीवरील शुल्क काही प्रमाणात लागू ठेवणे गरजेचे होते. जेणेकरून वाटाण्याचे दर किमान आधारभूत किमतीच्या खाली येऊ नये, असेही कोठारी यावेळी म्हणाले आहे. दरम्यान, वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यात प्रामुख्याने खानदेश, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात वाटाण्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!