Pik Vima Yojana : पीक विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप प्रगतीपथावर – धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “पंतप्रधान पीक विमा योजनेतील विम्याच्या (Pik Vima Yojana) अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 1 हजार 954 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना (Pik Vima Yojana) वितरित करण्यात आले असून, उर्वरित रकमेच्या वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे.” अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

‘यावर्षी पावसाअभावी राज्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी सरकारकडून पीक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. यातील 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून, 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. तर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती या 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपांवर अपील सुनावणी सुरु असून, पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.’ अशी माहिती कृषी विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

केवळ एक रुपयात विमा (Pik Vima Yojana In Maharashtra)

‘राज्य सरकारने केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला असून, त्यासाठी 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना 8 हजार 16 कोटी रुपये इतका विमा हप्ता द्यावा लागणार असून, 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.’ अशी माहितीही कृषी विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

रबीची पेरणी मंदावली

राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ 86 टक्के पाऊस झाला आहे. मात्र असे असले तरी यावर्षी आतापर्यंत 15 लाख 11 हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. सध्या जमिनीत ओलावा कमी झाल्याने रबी हंगामातील एकूण पेरणीपैकी केवळ २८ टक्के पेरणी झाली आहे. रबीसाठी यावर्षी 58 लाख 76 हजार हेक्टरवर पेरणीचे कृषी विभागाचे नियोजन आहे. राज्यात मागील वर्षी याच कालावधीत 13 लाख 50 हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली होती. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून, 17 लाख 53 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सध्या सरासरीच्या 45 टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून, यावर्षी 5.64 लाख हेक्टरवर म्हणजेच सरासरीच्या 26 टक्के हरभऱ्याची पेरणी झाली आहे. अशी माहितीही कृषी विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

error: Content is protected !!