Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा पोर्टलच्या माध्यमातून 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी शेतकरी आपला पीक विमा भरू शकणार आहेत.

राज्यातील प्रामुख्याने रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीसह कोकणातील आंबा, काजू आणि विदर्भातील संत्रा या पिकांसाठी पिक विमा योजनेत (Pik Vima Yojana) भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 होती. त्यामध्ये आता 5 डिसेंबर 2023 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला नसेल, अशा अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरावा, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

केंद्र सरकारची मान्यता (Pik Vima Yojana Date Extension)

रब्बी हंगामासाठी एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार आता दिनांक चार व पाच डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे.

पीक निहाय मुदत

दरम्यान, यापूर्वी रब्बी हंगामासाठी सरकारकडून पीकनिहाय मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारीसह फळपिकांसाठी 30 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. त्यात आता 5 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर बागायत गहू, हरभरा, रब्बी कांद्यासाठी 15 डिसेंबर; तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकांसाठी 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सरकारने हवामानावर आधारित फळपिक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळ पिकांचा समावेश आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्‍यांसाठी सक्तीची असून, बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना ऐच्छिक आहे.

error: Content is protected !!