Pik Vima Yojana : तुम्ही रब्बी पिकांचा विमा भरला का? ‘ही’ आहे शेवटची मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाप्रमाणेच आता यावर्षीच्या रब्बी हंगामातही गहू, हरभरा, रब्बी कांद्यासह आपल्या इतर पिकांचा विमा (Pik Vima Yojana) शेतकऱ्यांना एका रुपयात काढता येणार आहे. सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची (Pik Vima Yojana) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मागील वर्षी २०२२-२३ च्या रब्बी हंगामात साडेसात लाख शेतकऱ्यांनी साडेपाच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांचा एका रुपयात विमा उतरविला होता. तर यंदाच्या २०२३-२४ च्या खरीप हंगामात सुमारे एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी एक कोटी १२ लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. सलग दोन हंगामात पीक विमा योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे यंदाच्या रब्बी हंगामातही पीक विमा काढण्यास मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पीक निहाय मुदत

रब्बी हंगामासाठी सरकारकडून पीकनिहाय मुदत देण्यात आली आहे. रब्बी ज्वारीसाठी नोव्हेंबरअखेर, तर बागायत गहू, हरभरा, रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर; तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. असे कृषी विभागाने म्हटले आहे.

राज्य सरकार भरणार शेतकरी हिस्सा

शेतकऱ्यांना पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, पावसातील खंड आदी नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनाची हानी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाची फरतफेड, पुढील पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. योजनेत यावर्षीपासून शेतकरी हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही एका रुपयात नोंदणी करता येते.

error: Content is protected !!