PM Kisan Mandhan Scheme : शेतकऱ्यासांठी ‘ही’ आहे पेन्शन योजना; वर्षाला मिळतील 36 हजार रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना (PM Kisan Mandhan Scheme) राबवल्या जातात. यातील काही योजना या शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी राबविल्या जातात. तर काही योजना या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी सुरु करण्यात आल्या आहे. याशिवाय काही योजना या शेतकऱ्यांना आपल्या वृद्धापकाळात मदत मिळावी यासाठी आहेत. यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Scheme) होय. ही योजना केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा पेन्शन मिळावी, यासाठी सुरु केली आहे.

काय आहे ही योजना? (PM Kisan Mandhan Scheme For Farmers)

शेतकऱ्यांना व शेतमजुरांना आपल्या वृद्धापकाळात आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने ही पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Scheme) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत एक निश्चित रक्कम मासिक स्वरूपात जमा केली जाते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर हप्त्याच्या स्वरूपात जमा केलेली रक्कम उर्वरित आयुष्यासाठी दरमहा पेन्शन म्हणून सरकारकडून दिली जाते. या योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरु असून, 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. या योजनेत आतापर्यंत योजनेच्या सुरुवातीपासून एकूण 24 लाखांहुन अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन

देशातील शेतकऱ्यांची आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने 12 सप्टेंबर 2019 रोजी ही पीएम किसान मानधन योजना सुरू केली. देशातील सर्व लघु आणि अल्पभूधारक शेतकरी पेन्शन फंडाची मासिक वर्गणी जमा करून, योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत मासिक हप्त्यात निश्चित रक्कम भरावी लागते. त्यानंतर 60 वर्ष वयानंतर त्या शेतकऱ्याला मासिक 3,000 रुपये तर वार्षिक 36 हजार रुपये मिळतात. यामध्ये प्रामुख्याने 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी 55 रुपये मासिक हप्ता जमा करावा लागतो. तर एखाद्या व्यक्तीने 40 व्या वर्षी ही योजना सुरू केली, तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागते. 

कुठे कराल अर्ज?

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील लघु आणि मध्यम क्षेत्र असलेले शेतकरी या योजनेद्वारे पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी जवळचा डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. याशिवाय जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन देखील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट ऑनलाइन नोंदणी देखील करू शकतात. यासाठी अधिकृत वेबसाईट maandhan.in सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर शेतकरी स्वतःची सर्व माहिती भरून अर्ज करू शकतात.

error: Content is protected !!