हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यासांठी अनेक योजना (PM Kisan Yojana) राबवल्या जातात. तर अनेक राज्य सरकारे देखील आपआपल्या परीने शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवत असतात. अशातच आता राजस्थान सरकारने राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 125 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) सहा हजार रुपयांऐवजी 8000 रुपये वार्षिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राजस्थानमधील या दोन निर्णयांमुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
गव्हाला 125 रुपये बोनस (PM Kisan Yojana Rajasthan Government)
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी याबाबत घोषणा केली असून, त्यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, राजस्थानातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षीपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये दिले जाणार आहे. या निर्णयामुळे राजस्थान सरकारच्या तिजोरीवर 1300 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय राजस्थान सरकारने राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या किमान आधार किमतीवर 125 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त देण्याचाही निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ज्यामुळे आता राजस्थानातील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल गव्हासाठी 2275 रुपये हमीभाव अधिक राज्य सरकारचा 125 रुपये प्रति क्विंटल बोनस मिळणार आहे. अर्थात एका क्विंटल गव्हाला तेथील शेतकऱ्यांना 2400 रुपये इतका दर मिळणार आहे.
दरम्यान, राजस्थान हे गहू उत्पादनातील देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य असून, त्या ठिकाणी पूर्व राजस्थानात मोठ्या प्रमाणात गहू पिकाचे उत्पादन घेतले जाते. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 94 लाख हेक्टर लागवड क्षेत्र व 283 लाख टन गहू उत्पादनासह उत्तरप्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे. 35 लाख हेक्टर लागवड क्षेत्र व 165 लाख टन गहू उत्पादनासह पंजाब दुसऱ्या क्रमांकावर, 26 लाख हेक्टर लागवड क्षेत्र व 115 लाख टन उत्पादनासह हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर तर 30 लाख हेक्टर लागवड क्षेत्र व 100 लाख टन गहू उत्पादनासह राजस्थान देशात चौथ्या क्रमांकावर आहे.