जलसमाधी आंदोलनाबाबत तुपकरांना पोलिसांची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस नुकतीच पोलिसांनी दिली आहे. मात्र, कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही. सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी मुंबई येथे जलसमाधी आंदोलन करणार, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.

काय आहे नोटीस ?

मुंबई येथे अरबी समुद्रात २४ नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलन तुपकर यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनामुळे बुलडाणा जिल्ह्यासह मुंबई व इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण आंदोलन करू नये, अशा स्वरूपाची नोटीस बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी बजावली आहे.

आता माघार नाही

पोलिसांच्या माध्यमातून नोटिसा पाठवून सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी आडवा-आडवी केल्यास सरकारला महागात पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांचा हा लढा आहे. आता माघार घेणार नाही, असे तुपकर यांनी जाहीर केले. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता बुलडाणा येथून वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना होईल. २४ ला सकाळी १० वाजता मंत्रालयाशेजारी गिरगाव चौपाटीवरुन समुद्रात जलसमाधी घेतील, असेही त्यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या ?

–उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के या सूत्राप्रमाणे सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार तर कापसाला दिड हजार रुपये भाव द्या.
–सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा.
–आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा.
— खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावा.
–ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा.
–शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे.
–जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
— त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.

error: Content is protected !!