Pomegranate Export : डाळींब उत्पादकांना मोठी संधी; अमेरिकेत निर्यात पुन्हा सुरु!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तांत्रिक कारण देत अमेरिकेने 2017-2018 पासून भारतीय डाळिंबाच्या (Pomegranate Export) आयातीस बंदी घातली होती. मात्र आता एपीडा आणि एन. पी.पी.ओ या संघटनेने अमेरिकन कृषी विभागाशी चर्चा केली असून, त्यानुसार अमेरिकेकडून भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. परिणामी, राज्यातील डाळिंब उत्पादकांना मोठी संधी उपलब्ध झाली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधेचा वापर करुन मोठ्या प्रमाणात डाळिंब निर्यात (Pomegranate Export) करावी, असे आवाहन राज्याच्या पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतिश वाघमोडे यांनी केले आहे.

पहिली खेप रवाना (Pomegranate Export From India)

केंद्र सरकारच्या अन्न आणि कृषी प्रक्रियाकृत विभाग (एपीडा), एन. पी.पी.ओ (नॅशनल प्लॅंट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व के. बी.एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत डाळींब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असून, पहिली खेप नुकतीच फ्लोरिडा शहरात पाठवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली असून, एकूण 336 बॉक्सेसमधून 1 हजार 344 किलो भगव्या प्रजातीचे डाळिंब हवाई मार्गे अमेरिकेत पाठविण्यात आले आहे. यावेळी एन.पी.पी.ओ. मुंबईचे सहाय्यक संचालक एन. के. मिना, अपेडा मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक पी. ए. बामने, निर्यातदार कौशल खक्कर, कृषि पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतीश वाघमोडे उपस्थितीत होते. पहिल्या खेपेला अमेरिकन निरीक्षक लुईस यांनी हिरवा झेंडा दाखवला.

विकिरण प्रक्रिया आवश्यक

अमेरिकन कृषि विभागाच्या मागणीनुसार, संपूर्ण सुरक्षित अशा डाळिंबांची निर्यात 24 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. यामध्ये माईटवॉश, सोडियम हायपोक्लोराइट प्रक्रिया, वॉशिंग-ड्राइंग इ. प्रक्रिया केली जात आहे. याशिवाय त्यांनी निश्चित केलेल्या मानांकानुसारच बॉक्समध्ये पॅकिंग करुन, डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करून डाळींब निर्यात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला डाळिंब निर्यात करायचा असेल तर त्यांना निर्यातीसाठी या प्रक्रिया पार पाडून, निश्चित केलेल्या मानकांनुसार डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे. असेही वाघमोडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारतीय डाळिंबामध्ये कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अँटी ऑक्सिडंट असल्याने, अमेरिकेत डाळिंबाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन जास्तीत जास्त उत्पादकांनी या सुविधेचा वापर करावा, असेही ते शेवटी म्हणाले आहे.

error: Content is protected !!