Pomegranate Export : सोलापूरचे डाळिंब निघाले अमेरिकेला; पहिल्या खेपेद्वारे 12.6 टन माल निर्यात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील डाळींब उत्पादक (Pomegranate Export) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच अमेरिकेने भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवली. ज्यामुळे आता अमेरिकेत भारतीय डाळिंब पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून 28 फेब्रुवारी 2024 रोजी डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेत पाठवण्यात आली आहे. नवी मुंबई येथील आयएनआय फार्म्सद्वारे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) मदतीने ही डाळिंब निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे आता डाळींब निर्यातीत (Pomegranate Export) आगामी काळात भरघोस वाढ होण्यास मदत मिळणार आहे.

4200 पेट्यांतून 12.6 टन माल निर्यात (Pomegranate Export From Maharashtra)

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि एपीडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी डाळिंबाच्या 4200 पेट्यांच्या (12.6 टन) या पहिला खेपेला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी एपीडाकडे डाळिंब निर्यातीसाठी (Pomegranate Export) ‘अनार्नेट’ या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती. अशा शेतकऱ्यांकडून ही डाळिंब घेण्यात आली आहेत. इतर निर्यात बाजारांच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता 20 टक्के आणि देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत 35 टक्के डाळींब दर अधिक आहे. ज्यामुळे याचा संबंधित शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

डाळिंब क्षेत्रफळ व उत्पादनात वाढ

दरम्यान, केंद्रीय कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) 2022-23 मध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई), बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन आणि ओमानला 58.36 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स किमतीच्या डाळिंबाची निर्यात केली आहे. याशिवाय गेल्या दशकभरात देशातील डाळिंबाचे क्षेत्रफळ, तसेच उत्पादनात वाढ झाली आहे. इतकेच नाही तर निर्यातीत देखील मोठी वाढ झाली आहे. असेही एपीडाने या खेपेला हिरवा झेंडा दाखवताना म्हटले आहे.

महाराष्ट्रात 50 टक्क्यांहून अधिक उत्पादन

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या डाळिंब पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही डाळिंब उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. इतकेच नाही तर अलीकडच्या काळात डाळिंबाचे उत्पादन 20-25 टक्क्यांनी निकोप दराने अर्थात रोगराईमुक्त होत आहे. असेही एपीडाने म्हटले आहे.

error: Content is protected !!