हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एक अनार सौ बिमार’ (Pomegranate Farming) ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ एखाद्या वस्तूची मागणी अधिक मात्र ती एकच असणे. असेच काहीसे डाळिंब उत्पादनाबाबत असून, डाळिंबाला वर्षभर बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डाळिंब लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये क्रेज वाढत आहे. मात्र, केवळ चार राज्यांमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक 95 टक्के डाळिंब उत्पादन होते. यातही देशातील एकूण उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक डाळींब उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. आज आपण देशातील डाळींब उत्पादनाबाबत (Pomegranate Farming) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
54.85 टक्के उत्पादन महाराष्ट्रात (Pomegranate Farming In Maharashtra)
डाळिंब उत्पादनाबाबत (Pomegranate Farming) महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. राज्यातील जमीन आणि वातावरण हे डाळिंब पिकाला अनुकूल असल्याने, या ठिकाणी सर्वाधिक उत्पादन होते. राष्ट्रीय फळबाग महामंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण उत्पादनापैकी 54.85 टक्के डाळींब उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, फायबर, आयर्न, पोटॅशियम, आणि झिंकचे प्रमाण असते. त्यामुळे उच्चभ्रू लोकांसोबतच आरोग्याच्या दृष्टीने जागरूक लोकांकडून मोठी मागणी असते.
‘ही’ आहेत चार प्रमुख राज्य
देशातील सर्वच राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात डाळिंब उत्पादन होते. मात्र, राष्ट्रीय फळबाग महामंडळाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार आघाडीच्या राज्यांमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के डाळींब उत्पादन घेतले जाते. यामध्ये 54.85 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर, 21.28 टक्के डाळिंब उत्पादनासह गुजरात दुसऱ्या स्थानावर, 9.51 टक्के उत्पादनासह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर तर 8.82 टक्के उत्पादनासह आंध्रप्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे.
डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे
डाळिंब हे फळ आरोग्याच्या दृष्टीने ग्राहकांसाठी तर कमाईच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी अशा दोन्हींसाठी खूप फायदेशीर असते. संशोधनानुसार, दररोज डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे दीर्घकालीन आजार, कर्करोग आणि अनेक हृदयविकारांची शक्यता कमी होण्यास मदत होते. याशिवाय सहनशक्ती वाढवण्याची, स्नायूंची जलद पुनर्प्राप्ती, किडनी स्टोनपासून बचाव आणि उत्तम पचनसंस्था निर्माण करण्यासाठी डाळिंबाचे खाणे उत्तम मानले गेले आहे.