हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Poultry Feed) सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. चिकनचे दरही तुलनेने कमीच आहे. मात्र याउलट कोंबड्यांना लागणारे खाद्य मात्र महागले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या घाट्याचा सौदा ठरत आहे. छोट्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्किल झाले आहे. ऐन हिवाळ्याचा हंगाम असतानाही अंडी दरात घसरण झाली आहे. याउलट खाद्यनिर्मितीसाठी प्रमुख घटक असलेल्या मकाच्या दरात मात्र वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा तर पोल्ट्री उत्पादकांना (Poultry Feed) तोटा सहन करावा लागत आहे.
खाद्य दरात झपाट्याने वाढ (Poultry Feed Expensive)
पोल्ट्री उद्योगातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, “डिसेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत अंड्यांना मोठी मागणी असते. वाढलेल्या मागणीमुळे अंडी दरात वाढ होते. मात्र सध्या हिवाळा सुरु असूनही गेल्या काही दिवसांपासून अंडी दरात सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. हा पोल्ट्री उद्योगासाठी चिंतेचा विषय आहे. मागील वर्षभरापासून कोंबड्यांच्या खाद्याच्या (Poultry Feed) किमती झपाट्याने वाढल्या आहे. मात्र असे असतानाही देशभरात घाऊक बाजारात अंडी 600 रुपये प्रति शेकडा या दरापेक्षा कमी दराने विकली जात आहेत.”
चिकनचे दरही कमीच
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत चिकनच्या दरात वाढ झाली होती. घाऊक बाजारात त्यावेळी जिवंत कोंबडीचे प्रति किलो दर 140 ते 160 रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र हा दर जास्त काळ न टिकता ऑक्टोबरमध्येच घसरला. जो अद्याप सुधारलेला नाही. ऑक्टोबरपासून आजही चिकनचे दर हे 80-90 रुपये प्रति किलो इतके आहे. याउलट पोल्ट्री उद्योगासाठी थंडीच्या दिवसात पक्षांना हिट तयार व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते. त्यामुळे वीजबिलही अधिकचे येत आहे. तसेच खाद्यही महागले आहे. मात्र, त्याचा सुनिश्चित परतावा मिळत नसल्याचे पोल्ट्री व्यवसायातून सांगितले जात आहे.
छोटे पोल्ट्री उत्पादक संकटात
महाराष्ट्रासह देशात असे अनेक शेतकरी आहेत. जे शेतीला जोडधंदा म्हणून छोटेखानी पोल्ट्री व्यवसाय उभारतात. मात्र, 15 हजार क्षमतेसह पोल्ट्री व्यवसाय करणारे हे शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत. या लेअर पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना, थंडीत विजेच्या वाढत्या वापरासह महागलेल्या खाद्यामुळे सध्या एका अंड्यासाठी 5 रुपयांहून अधिकचा उत्पादन खर्च येत आहे. याउलट घाऊक बाजारात मात्र अंडी 550 ते 600 रुपये प्रति शेकडा या रेंजमध्ये विकली जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा घाटा सहन करावा लागत आहे.