Power Tiller : सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी एक म्हणजे पॉवर टिलर. पॉवर टिलर हे बहुपयोगी यंत्र आहे. सध्या विविध कंपन्यांची यंत्रे बाजारात विकसित करण्यात आली आहेत. मात्र सर्वात बेस्ट पॉवर टिलर कोणते? त्यापासून कोणकोणती कामे करता येतात? तसेच पॉवर टिलर यंत्राला जोडता येणारी अवजारे किंवा उपयंत्रे कोणती याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
Power Tiller कोणती कामे करतात?
हे यंत्र अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. पॉवर टिलरच्या मदतीने शेतकरी कोरडी नांगरणीपासून ते चिखलणीपर्यंत व आंतरमशागतीची कामे, पाण्याचा पंप चालविणे, औषध फवारणी, भात भरडणी, दळण यंत्रणा, उसाची मशागत, तेलाचे घाणे चालविणे, आदी कामे या यंत्राद्वारे केली जाऊ शकतात.
ऊस बांधणीसाठी या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच फळबागांमध्ये झाडाच्या बुंध्यापर्यंत मशागत, तण नियंत्रणासाठी मशागत, उच्च दाबाने औषध फवारणी, पाण्याचे पाट तयार करणे धुरळणी ही कामेही सहज होऊ लागली आहेत.
पॉवर टिलरद्वारे विद्युत जनित्र चालवून वीज निर्मिती केली जाते. तसेच दळण कांडप यंत्रणा, तेलघाणा यामध्येही या यंत्राचा वापर करता येतो.
पॉवर टिलर हे सहजरीत्या हाताळता येते. या यंत्राला पुढील गतीचे सहा व मागील गतीचे दोन ते चार गिअर असतात. गती नियंत्रणात गिअर बरोबरच एक्सिलेटरचा वापरही कार्य ठरतो.
या यंत्राला जोडता येणारी अवजारे किंवा उपयंत्रे
रोटाव्हेटर – हे पॉवर टिलरचे महत्त्वाचे औजार आहे. याने नांगरट, ढेकळे बारीक करणे, जुन्या पिकांचे अवशेष काढणे, चिखलणी करणे यासाठी रोटाव्हेटरचा वापर केला जातो.
ट्रॉली – 500 किलो ते दीड टनापर्यंत मालाची वाहतूक या ट्रेलरद्वारे करता येते. ट्रेलरला ब्रेकची व्यवस्था असल्याने अडचणीतून वाहतुक करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
पॉवर स्प्रेअर – हाय प्रेशरने फवारणी करता येत असल्याने द्राक्ष, नारळ, आंबा, डाळिंब, चिकू यांच्या बागा तसेच ऊस, भात, कापूस, हळद, आले यांसारख्या पिकावर औषधे व किटकनाशकांची फवारणी करता येते.
कापणी यंत्र – हे यंत्र छोट्या भात, गहू उत्पादकांना किफायतशीर ठरते. एकाच वेळी सात ते आठ मजुराचे काम वेगात व कोणतेही नुकसान न करता होते. बार्ली गवत, नाचणी, वरी या पिकांची कापणीही करता येते.
पल्टी नांगर व कल्टिव्हेटर – रोटाव्हेटर ऐवजी खोल नांगरणीसाठी पल्टीचा वापर उपयुक्त ठरत असून रोटाव्हेटर यंत्रणा बाजूला करून त्या ऐवजी पल्टीफाळ नांगर जोडला जातो. तसेच या यंत्राला कल्टिव्हेटर जोडता येतो. कल्टिव्हेटर यंत्रणा फळबागा, वनशेती मधील मशागतीसाठी उपयुक्त ठरतो.
पाणी उपसा पंप – या यंत्राचा साह्याने विहिर, तलाव, शेततळे यामधील पाण्याचा उपसा करता येतो. पॉवर टिलरच्या पुढे अथवा हॅण्ड वेलरवर अगर स्वतंत्र ब्रॅकेटवर पंप बसवता येतो.
इतर वापर – पॉवर टिलरचा वापर हॉलर, चक्की, आटा मशीन, भात मळणी यंत्र, कडबाकुट्टी, जनरेटर, थ्रेशर, खड्डे खोदणी यासाठीही वापर केला जाऊ शकतो.