धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.

मागील दोन वर्षात कापसाला चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा देखील कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. मागील वर्षी देखील पावसामुळे कापसाच्या उत्पन्नांत घट झाली होती. आता या वर्षी देखील तीच स्थिती होईल या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. आधीच जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यातूनही पीक कसेबसे वाचवल्यानंतर आता पुन्हा रोग आणि किडींचे संकट उभे आहे.

सद्य स्थितीत कापूस पिकातील व्यवस्थापन

–कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
–कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
–कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

 

error: Content is protected !!