Raju Shetti : राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामात उसाला जादा दर मिळावा तसेच मागील हंगामातील उसाला वाढीव प्रति टन 400 रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा आक्रोश पदयात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना (वाळवा), नागठाणे, अंकलखोप, भिलवडी , वसगडे असा या पदयात्रेचा मार्ग आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक- Raju Shetti

दोनच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी कर्नाटकहुन शिरोळमार्गे औरंगाबादला जाणारा साखर वाहतुकीचा ट्रक फोडला होता. याशिवाय आक्रमक पवित्रा घेत शिरोळ हद्दीतील ऊसतोड रोखली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिरोळ पोलिसांनी याप्रश्नी तात्काळ मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला होता. तर तिकडे नृसिंहवाडी मार्गावरील मारुती मंदिरासमोर कारखान्याची ऊस तोड सुरू असल्याचे समजल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत ऊसतोड बंद पाडली होती. यावेळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये वादावादी, अंगावर जाऊन जाण्याचा प्रकार घडला होता. याशिवाय स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील सदलगा येथील फडात जाऊन ऊसतोड बंद पाडली होती.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 400 रुपये वाढीव दुसरा हप्ता देण्यात यावा, साखर करखान्यांचे वजन काटे डिजिटल करण्यात यावे. याबाबत साखर कारखान्यांना संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा आक्रोश पदयात्रेस सुरुवात केल्याने साखर कारखाना प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!