Red Chilli : नंदुरबारमध्ये लाल मिरचीचे दर घसरले; तेलंगणातील घसरणीचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तेलंगणातील बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीच्या (Red Chilli) दरात मोठी घसरण झाल्याचे वृत्त अवघ्या एक दिवसापूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लाल मिरचीची प्रमुख समिती असलेल्या नंदुरबार बाजार समितीतही पाहायला मिळाला आहे. आज नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. याशिवाय बाजार समितीत व्यापारी लाल मिरचीची (Red Chilli) खरेदी करण्यास देखील अनुत्सुकता दाखवत असल्याचे सांगितले जात आहे.

2 ते 3 हजारांपर्यंत घसरण (Red Chilli Prices Falls In Nandurbar)

आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यानंतर नंदुरबार जिल्हा हा लाल मिरचीच्या (Red Chilli) उत्पादनासाठी देशात विशेष प्रसिद्ध असून, येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील लाल मिरचीची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. मात्र आता तेलंगणातील बाजार समित्यांमध्ये सुख्या मिरचीचे दर कोसळल्याने, राज्यात ओल्या मिरचीचे दर घसरले आहे. चालू जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीला प्रति क्विंटलसाठी 4 हजार ते 7 हजाराच्या दरम्यान दर मिळत होता. मात्र हेच दर आज बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलसाठी 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. त्यामुळे लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

व्यापाऱ्यांकडून खरेदीस अनुत्सुकता

दर घसरणीला प्रामुख्याने तेलंगणातील घसरलेले मिरचीचे दर, मागील आठवडाभरापासून असलेले ढगाळ वातावरण ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास नववर्षाच्या सुरुवातीपासून पावसाचे वातावरण असल्याने लाल मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरेदी केलेली मिरची सुखवण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत व्यापारी देखील खरेदीस अनुत्सुकता दाखवत आहेत. अनेक व्यापारी तर हे लिलावासाठी देखील येत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर दर घसरणीचे संकट ओढवले आहे.

तीन दिवस लिलाव बंद

नंदुरबार बाजार समितीत चालू वर्षीच्या हंगामात आतापर्यंत 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. अजूनही मार्च महिन्याच्या शेवटीपर्यंत मिरचीचे लिलाव सुरुच राहणार आहे. परिणामी यावर्षी बाजार समितीत अंदाजित तीन लाख क्विंटल लाल मिरचीची आवक राहण्याचा अंदाज बाजार समिती प्रशासनाकडून बांधला जात आहे. दरम्यान, आज शनिवार असल्याने आणि सोमवारी मकर संक्रांत असल्याने आता तीन दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीलाही पावसामुळे बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्यातच आणखी तीन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फाटका बसणार आहे.

error: Content is protected !!