Red Chilli : तेलंगणात लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लाल मिरची (Red Chilli) उत्पादनाला मिचाँग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. मात्र असे असतानाही आंध्रप्रदेशसह प्रमुख मिरची उत्पादक राज्य असलेल्या तेलंगणामध्ये लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाल्याचे तेलंगणातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव त्यात मिचाँगचा फटका आणि आता दरात झालेली घसरण यामुळे लाल मिरची उत्पादक (Red Chilli) शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

16 ते 25 टक्क्यांनी घसरण (Red Chilli Prices Falls In Telangana)

तेलंगणाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीची (Red Chilli) आवक वाढली आहे. त्यातच आता मागील दोन महिन्यांमध्ये लाल मिरचीचे दर हे जवळपास 16 ते 25 टक्क्यांनी घसरले आहे. दोन महिन्यांपूर्वी तेलंगणातील वारंगल बाजार समितीत मिरचीला 21500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. याउलट सध्या त्या ठिकाणी 18000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. मिरचीच्या सर्वच प्रजातींच्या दरात ही घसरण झाली आहे. यावर्षी तेलंगणातील मिरची पिकावर मिचाँग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किडींच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एकरी उत्पादनातही मोठी घट झाली आहे. तेलंगणातील मिरची उत्पादक शेतकरी कमीत कमी 25,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी करत आहे.

व्यापारी खरेदीस अनुत्सुक

तेलंगणातील मिरची व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी राज्यातील मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात काळा मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यापासून लाल मिरचीच्या दरात 18000-19500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे व्यापारी देखील उच्च किमतीमध्ये मिरचीची खरेदी करण्यास अनुत्सुकता दाखवत आहे.

प्रमुख मिरची उत्पादक राज्य

तेलंगणा या राज्यांमध्ये लाल मिरची हे प्रमुख पीक असून, त्या ठिकाणी साधारणपणे 4 लाख एकर क्षेत्रावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यातून शेतकऱ्यांना एकरी सरासरी 1,865 किलो उत्पादन मिळते. राज्यात दरवर्षी 7.19 लाख टन लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. 2021-22 मध्ये तेलंगणातील मिरची उत्पादन हे 7.16 लाख टन नोंदवले गेले होते. ज्यात मागील वर्षी 2022-23 मध्ये 5.32 लाख टनांपर्यंत घट झाली होती.

error: Content is protected !!