Red Chilli : लाल मिरचीचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढणार? शेतकऱ्यांना फायदा होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लाल मिरची (Red Chilli) दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातंर्गत बाजारात आणि निर्यात मागणी वाढल्याने लाल मिरचीचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या घाऊक बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीला प्रति किलो 150 ते 190 रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ विक्रेत्यांकडून लाल मिरचीची 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. अर्थात लाल मिरचीच्या (Red Chilli) दरात वाढ झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना फायदा होणार (Red Chilli Prices Likely To Increase)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून लाल मिरचीची (Red Chilli) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नंदुरबार येथील बाजार ही लाल मिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. तर संभाजीनगर जिल्हा देखील लाल मिरचीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आता महाराष्ट्रासह या राज्यांमधील शेतकऱ्यांना लाल मिरचीच्या दरवाढीचा विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यांमध्ये लाल मिरचीच्या दरात जवळपास 40 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली होती. मात्र, आता लाल मिरचीच्या दरात पुन्हा हळूहळू सुधारणा होत लागल्याचे लाल मिरची व्यापारातील एका व्यापाऱ्याने म्हटले आहे.

उत्पादनात घट होण्याची शक्यता

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आलेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील लाल मिरचीचे पीक मोठया प्रमाणात खराब झाले होते. याशिवाय कर्नाटक या राज्यातही यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने लाल मिरचीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण लाल मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याउलट सध्या देशात गृहिणींचे घरगुती मसाला तयार करण्याचे दिवस सुरु झाल्याने देशातंर्गत मागणी वाढली आहे. तसेच निर्यात मागणीतही गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी अधिक राहून तुटवडा निर्माण झाल्यास, लाल मिरचीचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय लाल मिरची निर्यात व्यापारातील एका व्यापाऱ्याने म्हटले आहे की, “सध्या भारतीय लाल मिरचीला चीनकडून मागणी वाढली आहे. याशिवाय देशातंर्गत साठेबाजांकडूनही लाल मिरचीला मागणी वाढली आहे. ज्यामुळे सध्या लाल मिरचीचे दर प्रति किलोमागे 20 रुपयांनी वाढले आहेत. तर दक्षिण-पूर्व आशियाई देश आणि शेजारील श्रीलंकेतही सध्या विक्रमी लाल मिरचीची निर्यात सुरु आहे.”

error: Content is protected !!