Red Chilli : नंदुरबार बाजार समितीत लाल मिरची विक्रमी आवक; 10 वर्षांचा उच्चांक मोडला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वात मोठी लाल मिरचीची (Red Chilli) बाजारपेठ असलेल्या नंदुरबार बाजार समितीत सध्या लाल मिरचीची विक्रमी आवक पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सध्या दररोज जवळपास 300 ते 400 वाहनांमधून शेतकरी तीन ते चार हजार क्विंटल ओली लाल मिरची विक्रीसाठी आणत आहे. मागील वर्षीच्या हंगामात एकूण 2 लाख 25 हजार क्विंटल लाल मिरची नंदुरबार बाजार समितीत दाखल झाली होती. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेपर्यंतच बाजार समितीत लाल मिरचीची एकूण 2 लाख 60 हजार क्विंटल आवक नोंदवली गेली आहे. लाल मिरचीची (Red Chilli) ही आवक मागील 10 वर्षातील सर्वाधिक आवक मानली जात आहे.

किती मिळतोय दर? (Red Chilli Record Arrival In Nandurbar APMC)

नंदुरबार बाजार समिती ही आंध्रप्रदेशातील गुंटूर बाजार समितीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लाल मिरचीची (Red Chilli) बाजार समिती आहे. सध्याच्या घडीला नंदुरबार बाजार समितीत 300 ते 400 वाहने येत असून, त्याद्वारे तीन ते चार हजार क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. सध्या ओल्या लाल मिरचीला बाजार समितीत कमाल 9000 हजार ते किमान 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे.

हंगामात 3 लाख क्विंटल आवक?

दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नंदुरबार बाजार समिती 2 लाख 60 हजार क्विंटल इतकी आवक नोंदवली गेली आहे. जी मागील 10 वर्षांमधील सर्वाधिक आवक असल्याचे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे. तर यावर्षी एकूण हंगामात लाल मिरचीच्या आवकचा बाजार समितीतील आकडा हा 3 लाख क्विंटलपर्यंत पोहचू शकतो. अशी शक्यता ही बाजार समिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

दर सुधारणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या पावसाच्या वातावरणामुळे नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीचे दर मोठया प्रमाणात घसरले होते. जवळपास 15 दिवस पावसाचे वातावरण आणि ढगाळ वातावरण असल्याने व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी तयार नव्हते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीला प्रति क्विंटलसाठी 4 हजार ते 7 हजाराच्या दरम्यान दर मिळत होता. मात्र हेच दर मकर संक्रांतीच्या काळात प्रति क्विंटलसाठी 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत खाली घसरले होते. ज्यामुळे लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र आता दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!