हॅलो कृषी ऑनलाईन : लाल मिरची (Red Chilli) म्हटले की सर्वप्रथम तिचा तिखटपणा आणि झणझणीतपणा आठवतो. देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी लाल मिरचीचे उत्पादन होते. अशातही संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या लाल मिरचीने आपले वेगळेपण जपले असून, तिच्या विशिष्ट गुणधर्मांची पाहणी करून तिला जीआय मानांकन दिले जाणार आहे. यासाठी केंद्रीय पथक मार्च महिन्यात संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात या लाल मिरचीच्या (Red Chilli) वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेण्यासाठी येणार आहे.
20 गावांची होणार पाहणी (Sambhajinagar Red Chilli Get GI Rating)
आजपर्यंत महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचा देवगड हापूस आंबा, नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे, जळगाव जिल्ह्यातील केळी व भरताची वांगी, वायगावची हळद, अलिबागचा पांढरा कांदा, नागपुरची संत्री यासह 34 कृषी मालाला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. अशातच आता संभाजीनगर सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानने केंद्र सरकारकडे जीआय मानांकनासाठी प्रस्ताव पाठवला असून, त्यानुसार लवकरच चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक हे सिल्लोडला भेट देणार आहे. यावेळी पथकाकडून तालुक्यातील 20 गावांची पाहणी केली जाणार आहे. यात मिरची उत्पादन जमिनीतील मातीचे नमुने, पाण्याचे नमुने, आणि इतर माहिती या पथकाकडून गोळा केली जाणार आहे. त्यामुळे आता जीआय मानांकनासाठीचे पहिले पाऊल लाल मिरचीच्या दिशेने पडले आहे.
काय आहे विशेषतः?
संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात उत्पादित होणारी लाल मिरची ही उग्र आणि अतितिखट आहे. तिची विशेषतः म्हणजे ती रोगांना बळी पडत नाही, बुरशीजन्य रोगांना देखील जुमानत नाही. याशिवाय तिच्यामध्ये टिकाऊपणा असल्याने ती लवकर खराब होत नाही. तालुक्यात लाल मिरचीचे उत्पादन होणाऱ्या भागातील मातीमध्ये झिंक, मँगनीज, फॉस्फरस व ह्युमिक यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील मिरचीत कैंपसेनॉईड घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतो. इतकेच नाही तर या मिरचीला राज्यासह देशात आणि विदेशात देखील मोठी मागणी आहे. सिल्लोड येथून बांगलादेश, पाकिस्तान, दुबई आणि अन्य अरब देशांमध्ये तिची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.