हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने आपल्या गैर-बासमती तांदळाच्या (पांढरा तांदूळ) निर्यातीवर (Rice Export) पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे जागतिक तांदूळ दरवाढीमुळे एका बाजूला आफ्रिका आणि अन्य आशियायी देशांना मोठ्या धान्य टंचाईला (Rice Export) सामोरे जावे लागत आहे. भारताचे परंपरागत आयातदार असलेल्या या देशांना आता अन्य निर्यातदार देशांकडून चढ्या दराने तांदूळ खरेदी करणे भाग पडत आहे. यामुळे चीन, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम या देशांची चांदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तांदूळ दरवाढी मागील प्रमुख कारण म्हणजे 20 जुलै 2023 पूर्वी भारताचा तांदूळ जागतिक बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होता. मात्र आता भारतीय तांदूळ निर्यात (Rice Export) पूर्णपणे थांबल्याने जागतिक बाजारात एक पोकळी निर्माण झाली आहे. ज्याचा चीन, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम या देशांना मोठा फायदा झाला असून, हे देश आपला तांदूळ जागतिक बाजारात चढ्या दराने विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम या तीन निर्यातदार देशांकडे पाहिजे तितका तांदूळ साठा उपलब्ध नाही. मात्र, हे देश भारतीय तांदूळ निर्यात बंदीचा फायदा घेत, आपला निर्यातीस उपलब्ध तांदळाचा साठा चढ्या दरात विक्री करत आहे. यात पाकिस्तानचीही चांदी झाली आहे.
थायलंडकडून शेतकऱ्यांना अनुदान (Rice Export From India)
थायलंडकडून तांदूळ तेजीचा फायदा घेण्यासाठी आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा साठा करून ठेवण्यासाठी अनुदान दिले जात आहे. व्हिएतनामने तर खेळी करत बंदी नसलेल्या भारतीय तपकिरी तांदळाची आयात सुरु केली आहे. आणि व्हिएतनाममधील तांदूळ साठा फिलिफिन्स या देशाला निर्यात करण्याचे धोरण अवलंबले आहे.
आफ्रिकी देशांना चीनचा पर्याय
अनेक आफ्रिकी देशांमध्ये तांदळाचा तुटवडा आहे. आयवरी कोस्ट भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात करत होता. मात्र, हा देश आता चीनकडून तांदूळ आयात करत आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या शेवटीपर्यंत आयवरी कोस्टने चीनकडून जवळपास 40 ते 45 हजार टन तांदूळ आयात केला आहे. तर कांगो व घाना या आफ्रिकी देशांनीही चीनकडून ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी 20 हजार टन तांदूळ आयात केला आहे. कांगो या देशाची जुलै 2018 नंतरची एका महिन्यातील ही सर्वाधिक तांदूळ आयात ठरली आहे. यावरून आफ्रिकी देशांमध्ये असलेली तांदूळ टंचाई अधोरेखित होते.