हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात तांदळाचा पुरवठा आणि मागणी यातील स्थिती गुंतागुंतीची बनली आहे. भारताने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर (Rice Export) कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे परंपरागत आयातदार देश आता भारतीय तपकिरी तांदळाची आयात करण्यास प्राधान्य देत आहे. यामध्ये प्रामुख्याने आयातदारांकडून ‘स्वर्ण’ या प्रजातीचा तपकिरी तांदूळ (Rice Export) खरेदी केली जात आहे. व्हियेतनाम या देशाने भारताच्या तपकिरी तांदळाची आयात सुरु केली आहे.
कृषी माल निर्यात संघटनेच्या माहितीनुसार, “तपकिरी तांदळाच्या खरेदीसाठी विदेशी आयातदारांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. मात्र देशांतर्गत बाजारात दर स्थिरीकरणासाठी केंद्र सरकारने तपकिरी तांदळावर 500 डॉलर प्रति टन निर्यात मूल्य (20 टक्क्यांपर्यंत) लागू करत निर्बंध कडक केले आहेत. सध्यस्थितीत व्हियेतनाम या देशाने निर्यात करार केला असून, त्यानुसार भारतातून तपकिरी तांदळाची निर्यात सुरु आहे. आतापर्यंत व्हियेतनामला 5 हजार टन तांदूळ पाठवण्यात आला आहे. लवकरच विचारणा करणाऱ्या अन्य देशांकडूनही तपकिरी तांदळासाठी निर्यात करार होण्याची अपेक्षा आहे.”
निर्बंध वर्षभर ‘जैसे थे’ (Rice Export From India)
दरम्यान, भारत सरकारने 20 जुलै 2023 पासून गैर-बासमती (पांढरा) तांदूळ निर्यातीस पूर्णतः बंदी घातली आहे. तर सध्यस्थितीत बासमती तांदळावरही 950 डॉलर प्रति टन इतके निर्यात मूल्य लागू केले जात आहे. तांदूळ निर्यातीवरील हे निर्बंध आणखी वर्षभर असेच राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या या धोरणामुळे जागतिक बाजारात तांदळाच्या पुरवठ्याची स्थिती खूप गुंतागुंतीची झाली आहे. परिणामी तपकिरी तांदळाप्रमाणे सेला तांदळावरील निर्यात मूल्य हे कमी (20 टक्के) असल्याने आयातदारांकडून सेला तांदळाचीही मागणी होत आहे.
तपकिरी-पांढऱ्या तांदळातील फरक
धानापासून केवळ त्याचे वरील आवरण (भूस) दूर केले की तपकिरी तांदूळ मिळतो. सर्व पांढरा तांदूळ हा पॉलिश करण्यापूर्वी तपकिरी तांदूळच असतो. धानाचे वरील आवरण दूर केले की मिळणारा सर्व तांदूळ हा तपकिरी तांदूळ असतो. त्यानंतर त्याला पॉलिश केली की तो ‘पांढरा तांदूळ’ म्हणून ओळखला जातो. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदळात खनिजे, फायबर आणि जीवनसत्वे अधिक असतात. मात्र असे असले तरी बदलत्या जीवनशैलीमुळे रोजच्या आहारात पांढऱ्या तांदळाचा वापर अधिक पाहायला मिळतो.