Rice Price : भारताच्या निर्यात बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदूळ महागला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमती (Rice Price) नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही दिवसांपासून अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये तांदूळ निर्यातीवरील शुल्कात वाढ करत गैर-बासमती तांदळावर पूर्णतः बंदी घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दरात (Rice Price) जवळपास 24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तांदळाचे दर मागील 15 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत.

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीपैकी 40 टक्क्यांहून अधिक निर्यात भारतातून केली जाते. त्यातच आता देशांतर्गत बाजारातील वाढती महागाई लक्षात घेता भारत सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील बंदी पुढील वर्षीपर्यंत कायम ठेवली जाऊ शकते. या बंदीमुळे देशांतर्गत बाजारात तांदळाची उपलब्धता राहून दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तांदूळ तुटवडा (Rice Price In International Market)

केंद्र सरकारच्या या निर्यात बंदीमुळे जागतिक बाजारात सध्या तुटवडा निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर 2023 या महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत तांदळाचे दर 24 टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, भारतातही मागील वर्षीच्या तुलनेत तांदळाचे दर 18 टक्क्यांनी तर गव्हाचे दर 11 टक्क्यांनी वाढले असल्याचे निरीक्षण केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने नोंदवले आहे.

गरीब देश अडचणीत

भारत सरकारच्या तांदूळ निर्यातीवरील बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किंमती वाढून गरीब देशांसमोर अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. छोट्या देशांमध्ये तांदळाच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहचून 2008 नंतर प्रथमच यावर्षी सर्वात मोठी अन्नधान्य महागाई ठरू शकते. असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!