Sesame Cultivation: जाणून घ्या, उन्हाळी तीळ लागवडीचे तंत्र!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तीळ हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. तीळ लागवड प्रामुख्याने खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी (Sesame Cultivation) अशा तिन्ही हंगामांत केली जाते. तीळ लागवडीनंतर हवामानात अचानक बदल झाल्यास तिळाची प्रत खालावते. याउलट उन्हाळी हंगामातील तीळ लागवडीमध्ये अधिक उत्पादन मिळून प्रतही चांगली मिळते. पांढऱ्या शुभ्र रंग असलेल्या तिळाला बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळी तीळ लागवडीकडे (Summer Sesame Cultivation) कल वाढलेला दिसत आहे. उन्हाळी हंगामातील तीळ लागवड अधिक फायदेशीर ठरते.

लागवडीची वेळ आणि कालावधी: उन्हाळी तीळ लागवडीसाठी (Sesame Cultivation) १५ फेब्रुवारीपर्यंतचा काळ योग्य असतो. उगवणीसाठी किमान १५ अंश, कायिक वाढीसाठी २१ ते २६ अंश आणि फुलधारणेसाठी २६ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.  तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलगळ होते. तसेच फुलधारणेच्या काळात जास्त पाऊस झाला तरीदेखील फुलगळ होते.

जमीन: मध्यम ते भारी, पाण्याची निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी. वालुकामय पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पीक चांगले येते. पूर्वमशागत  खोल नांगरट करून कुळवाच्या साह्याने जमीन भुसभुशीत करावी. किंवा रोटाव्हेटरच्या मदतीने जमीन तयार करावी. पेरणीपूर्वी जमिनीवर लाकडी फळी फिरवून जमीन दाबून सपाट करावी. म्हणजे उगवण चांगली होण्यास मदत होते.

तिळाचे सुधारित वाण व त्याचे गुणधर्म   (varieties For Sesame Cultivation)

जे.एल.टी – ४०८-२ (फुले पुर्णा): ही जात  ८४ ते ९७ दिवसात पक्व होते. मूळ व खोड कुजव्या रोगास साधारण प्रतिकारक आहे.  तेलाचे प्रमाण ४९ टक्के असून उत्पादन ७ ते ८ क्विंटल देते.

ए.के.टी.-१०१: ९० ते ९५ दिवसात पक्व होते. पर्णगुच्छ, मूळ व खोड कुजका रोगास सर्वसाधारण प्रतिकारक आहे. तेलाचे प्रमाण ४८ ते ४९ टक्के असून ७.५ ते ८ क्विंटल उत्पादन देते.

बीजप्रक्रिया: प्रतिकिलो बियाण्यांस, थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम याप्रमाणे चोळावे. त्यानंतर ॲझेटोबॅक्टर अधिक पीएसबी २५ ग्रॅम चोळावे.

पेरणी: शक्यतो बैलचलित पाभरीने ३० बाय १५ सेंमी किंवा ४५ बाय १० सेंमी अंतरावर पेरणी करावी. पेरणीवेळी बियाणे २.५ सेंमीपेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर परिणाम होतो. पेरणीसाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे पुरेसे आहे.

विरळणी: पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी पहिली, तर १५ ते २० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. हेक्टरी रोपांची संख्या २.२२ लाख इतकी ठेवल्यास फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन 

· शेवटच्या कुळवणीअगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ५ टन किंवा एरंडी पेंड १ टन याप्रमाणे जमिनीत मिसळावे.

· तीळ पिकास हेक्टरी ५० किलो नत्राची मात्रा द्यावी. पहिली अर्धी मात्रा २५ किलो नत्र पेरणीवेळी आणि उर्वरित मात्रा पेरणीनंतर २१ दिवसांनी द्यावी. नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर पिकांस लगेच पाणी द्यावे.

· अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना २ टक्के युरियाची फवारणी करावी.

आंतरमशागत: सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांच्या कालावधीत तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी आणि निंदणी करावी. तर ३० ते ३५ दिवसांनी दुसरी कोळपणी आणि गरजेनुसार निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापन : उन्हाळी तीळ पिकास (Sesame Cultivation)जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुले येण्याच्या आणि बोंडे धरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. 

पीक संरक्षण:  

पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी व गादमाशी, रसशोषक किडी, तुडतुडे, कोळी व पांढरी माशी  किडीच्या बंदोबस्तासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाण्यातून)  ५ टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मिलि याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी घ्यावी.

उन्हाळी तीळ पिकात (Summer Sesame Cultivation) पर्णगुच्छ, मर, व खोड व मूळ कुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, रोगग्रस्त झाडे अथवा भाग गोळा करून नष्ट करावा. प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम फवारणी प्रतिलिटर पाण्यातून करावी.

error: Content is protected !!