Sharad Pawar : शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला अजिबातही कळवळा नाही – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात (Sharad Pawar) सापडलाय. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस या संकटांनी शेतकऱ्याला घेरले आहे. तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारला अजिबातही आस्था किंवा कळवळा राहिलेला नाही.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे आयोजित राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलते होते.

सरकारचे धोरण शेतकरीविरोधी (Sharad Pawar On Modi Government)

राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करत प्रचंड मेहनत घेत पिकांचे उत्पादन घेतले. मात्र भाजप व मोदी सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. जगभरात कांदा, साखरेला मागणी असताना केंद्र सरकारने निर्यातबंदी करून भाव पाडले. मोदी सरकारने हा निर्यातबंदीचा खोडा घालून, शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. महागाई नियंत्रणासाठी निर्यातबंदी करतोय असे सरकार वारंवार सांगते, मात्र कांदा दर आणि महागाई यांची तुलना करणे पूर्णत: चुकीचे आहे, अशा शब्दात पवार यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहे.

पिकवणाऱ्यांचे काय?

आज देशातील शासनकर्ते निर्दयी झाले असून, शेतकऱ्यांबद्दल त्यांना थोडीही आपुलकी राहिलेली नाही. केंद्र सरकारकडून खाणाऱ्यांचा विचार केला जात आहे. तो निश्चितच करावा. मात्र शेतमाल पिकवणाऱ्यांचे काय? त्यांनी शेतमाल पिकवलाच नाही तर काय खाणार? त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

निर्यातीसाठी सरकारचा खोडा

पूर्वीच्या काळात देशाला बाहेरच्या देशांमधून गहू, तांदूळ, साखर, फळफळावळ यांसह अनेक अन्नधान्य आयात करावे लागत होते. मात्र तेव्हाच्या सरकारने शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेत देशातील अन्नधान्याचे प्रमाण वाढवले. मात्र सध्या शेतकऱ्यांची निर्यात करण्याची क्षमता असूनही, सरकारकडून निर्यात करण्यासाठी त्यांना खोडा घातला जात आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे. असेही पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!