हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हालाही शेतात जायला रस्ता (Shet Rasta) नाही का? तुमचाही पडीक जमीन, ओढा, नाला यातून जाणारा रस्ता समोरच्या शेतकऱ्याने बंद केलाय का? तर मग तुम्हीही मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम 5 नुसार किंवा मग तुमच्या जमिनीला रस्ताच अस्तित्वात नसेल तर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार तहसीलदारांकडे केवळ एक अर्ज करून शेत रस्ता (Shet Rasta) मिळवू शकता. चला तर मग पाहूया काय आहे अर्जाची प्रक्रिया…
वादाची पार्श्वभूमी (Shet Rasta Apply This Two Ways)
वारसा हक्कांमुळे सध्या जमिनीचे विभाजन होत आहे. कमाल जमीन धारणाही कमी झाली आहे. परिणामी सध्या गावागावांमध्ये शेतकऱ्यांना शेत रस्ता (Shet Rasta) नसल्याची बिकट समस्या जाणवत आहे. पूर्वी प्रति शेतकरी जमिनींचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी एकमेकांना सहकार्य करत बांधावरून चाकोरी ठेऊन रस्ता ठेवत होते. ओढा, नाला, पडीक जमीनमधून काही शेतकरी आपल्या शेतात जात होते. मात्र आता वाटणी होऊन जमिनी कमी होऊन, वहिवाटी रस्ते आणि शेतात जायला नवीन रस्ता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होत आहे.
तुमची नेमकी अडचण समजून घ्या?
- तुम्ही प्रामुख्याने दोन प्रकारे शेत रस्ता मिळवू शकता.
1. समजा तुमचा रस्ता हा वाडवडिलांपासून आहे. तुम्ही त्या रस्त्यावरून ट्रॅक्टर, तुमची शेतीच्या सर्व साधनांची वाहतूक वर्षानुवर्षे करत आहात. मात्र अचानक एखाद्या शेतकऱ्याने तुमचा रस्ता बंद केला, तुमच्या रस्ता नांगरून टाकला, रस्त्यावर विहिरीचा मलब्याचा उकिरडा घातला किंवा मग अन्य कोणती शक्कल लढवून तुमचा जाणारा मार्ग बंद केला असेल. तर तुम्हाला मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम 5 नुसार अर्ज करावा लागतो.
2. पूर्वीपासून तुमच्या जमिनीला रस्ताच नसेल तरीही चिंता करून नका. काही कारणास्तव नोकरी निमित्त बाहेर राहिल्यानंतर मोठा कालावधी गेल्याने जमीन पडीक राहून जमिनीला रस्ता नसल्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. मग अशावेळी तुमच्या जमिनीचा वडिलोपार्जित रस्ता माहिती असो किंवा नसो तुम्ही शेत रस्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार अर्ज करू शकता.
हा आहे दोन्ही कायद्यांमधील फरक?
म.ज.म.अ. कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 मधील फरक
म.ज.म.अ. कलम 143 | मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 |
साध्या अर्जावरून प्रकरण सुरू होते. | दावा दाखल केल्यावर प्रकरण सुरू होते. |
रस्ता अस्तित्वात नसतो. | रस्ता अस्तित्वात असतो. |
रस्ता अडविलेला नसतो. | रस्ता अडविलेला असतो. |
सरबांधावरुन नवीन रस्ता दिला जातो | रस्त्यातील अडथळा काढला जातो. |
रस्ता खुला करण्याचा आदेश देता येत नाही. | रस्ता खुला करण्याचा आदेश देता येतो. |
अर्ज दाखल करण्यास मुदतीचे बंधन नाही. | दावा दाखल करण्यास मुदतीचे बंधन आहे. |
तहसिलदारच्या आदेशाविरूध्द उपविभागीय अधिकार्याकडे अपील करता येते. | उपविभागीय अधिकार्याला जिल्हाधिकार्यांनी अपिलाचे अधिकार प्रदान केले असतील तरच तहसिलदारच्या आदेशाविरूध्द उपविभागीय अधिकार्याकडे अपील करता येते. अन्यथा जिल्हाधिकार्यांकडे अपील दाखल करावे लागते. |
उपविभागीय अधिकार्याकडील अपीलातील आदेशाविरूध्द अप्पर जिल्हाधिकार्यांकडे दाद मागता येते. | उपविभागीय अधिकारी/ जिल्हाधिकार्यांच्या अपीलातील आदेशाविरूध्द उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. |
निषेध आज्ञा देता येत नाही. | निषेध आज्ञा देता येते. |
अर्ज कसा करायचा?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोन प्रकारे रस्ता मिळू शकतो. अर्ज करू कोणत्या प्रकारे? तर मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम 5 नुसार रस्ता मिळवण्यासाठी अर्ज करणे उत्तम पर्याय आहे. मात्र त्यासाठी आधीपासून तुमचा रस्ता वहिवाटी असणे आवश्यक असते. मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम 5 नुसार अर्ज केल्यास तुम्हाला तुमचा रस्ता आठ दिवसांत खुला करून दिला जातो. तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार अर्ज केल्यास रस्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तीन महिने ते तीन वर्षही प्रकरण तहसीलदारांसमोर चालवले जाऊ शकते. त्यामुळे पहिला पर्याय हा उत्तम असतो. चला तर मग पाहूया सोप्या भाषेत अर्ज कसा करायचा.
नमुना अर्ज क्रमांक 1 (मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम 5 नुसार)
प्रति,
मा तहसिलदार साहेब,
(तुमच्या तालुक्याचे नाव)
अर्ज – मामलेदार कोर्ट कायदा 1906 च्या कलम 5(2) नुसार मी शेत रस्त्यासाठी (Shet Rasta) अर्ज करत आहे.
अर्जाचा विषय – शेतात जाणे-येण्यासाठी बंद केलेला रस्ता पुन्हा खुला करून देणेबाबत.
अर्जदाराच्या जमिनीचा तपशील –
नाव – (तुमचे संपूर्ण नाव टाका), गाव – (तुमच्या गावाचे नाव टाका), जिल्हा – (जिल्ह्याचे नाव टाका)
गट क्रमांक – 436, क्षेत्र – 1.30 हे.आर., आकारणी – 4.14 रुपये (कराची रक्कम)
मी (तुमचे संपूर्ण नाव टाका) (तुमचा संपूर्ण पत्ता) येथील कायम रहिवासी आहे. (जमीन असलेल्या गावाचे नाव) येथील गट क्रमांक — मध्ये माझ्या मालकीची — हेक्टर आर शेतजमीन आहे. मात्र माझा वडिलोपार्जित रस्ता दिनांक ….. या दिवशी बंद करण्यात आला. (तुम्हाला तुमचा रस्ता अडवल्याचे या ठिकाणी वर्णन करावे लागणार आहे. रस्ता कोणी अडवला, गाव नकाशानुसार तुमचा रस्ता कुठे अडवण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला असेल अशा संबंधित शेतकऱ्यांची नावे, त्यांचे गट क्रमांक आणि जमिनीसंदर्भात सर्व माहिती अर्जात नमूद करावी लागणार आहे. रस्ता अडवल्याच्या सहा महिन्याच्या आता तुम्हाला ही कार्यवाही करावी लागणार आहे)
तरी मौजे …, ता……. येथील गट क्रमांक — मध्ये शेतात गाडीबैल नेणे व घरी आणणे करता येईल, असा शेत रस्ता पुन्हा मिळवून द्यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.
आपला विश्वासू,
(तुमचे नाव टाका)
नमुना अर्ज क्रमांक 2 (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार)
प्रति,
मा तहसिलदार साहेब,
(तुमच्या तालुक्याचे नाव)
अर्ज – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.
अर्जाचा विषय – शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.
अर्जदाराच्या जमिनीचा तपशील –
नाव – (तुमचे संपूर्ण नाव टाका), गाव – (तुमच्या गावाचे नाव टाका), जिल्हा – (जिल्ह्याचे नाव टाका)
गट क्रमांक – 436, क्षेत्र – 1.30 हे.आर., आकारणी – 4.14 रुपये (कराची रक्कम)
लगतच्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता – (या ठिकाणी अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नावे आणि पत्ता लिहिणे अपेक्षित असते.)
त्यानंतर विस्तृतपणे तुम्ही असे लिहू शकता…
मी (तुमचे संपूर्ण नाव टाका) (तुमचा संपूर्ण पत्ता) येथील कायम रहिवासी आहे. (जमीन असलेल्या गावाचे नाव) येथील गट क्रमांक — मध्ये माझ्या मालकीची — हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणे-येणे करण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारे, बी-बियाने आणि रासायनिक खते नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसेच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरभरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तरी मौजे …, ता……. येथील गट क्रमांक — मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.
आपला विश्वासू,
(तुमचे नाव टाका)
(टीप – नमुना अर्ज क्रमांक 1 नुसार अर्ज करण्यापूर्वी आपल्या ओळखीतील एखाद्या वकील किंवा कायद्याची माहिती असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. म्हणजे तुम्हाला योग्य प्रकारे रस्ता तात्काळ मिळण्यास मदत होईल. नमुना अर्ज क्रमांक 1 नुसार अर्ज करताना दावा दाखल करावा लागतो. त्यासाठी तुम्ही थेट तुमच्या तहसीलदारांनाही भेटू शकता.)