Shevga Cultivation: कमी पाणी आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारा बहुगुणी शेवगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या हवामानातील बदल, कमी पाऊस आणि वाढणारा उत्पादन (Shevga Cultivation) खर्च यामुळे शेतकरी कमी खर्चिक आणि जास्त लक्ष द्यावे लागणार नाही अशा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यायला लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पि‍काबद्दल सांगणार आहोत ज्याचे उत्पादन कमी पाण्यात म्हणजे दुष्काळी भागातही घेता येते, ते म्हणजे शेवगा .

मागील काही वर्षात शेवग्याचे आहारातील महत्व व औषधी गुणधर्म यामुळे शेवग्याची मागणी वाढलेली आहे. जास्तीत जास्त शेतकरीही कमी खर्चात हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी शेवगा लागवडीकडे वळलेले आहेत. जाणून घेऊ या शेवगा लागवडीबद्दल (Shevga Cultivation).

हवामान आणि जमीन (Climate and Soil)

शेवग्याची वाढ 25 ते 35 अंश सेल्सिअसच्या समशीतोष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान किंवा कमालीचे कमी तापमान या पि‍कासाठी चांगले नाही.

शेवगा सर्व प्रकारच्या जमिनीत पिकवता येतो, पण हलक्या ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी व सामू 5 ते 7.5 दरम्यान असणार्‍या जमिनीत शेवग्याची चांगली वाढ होते.

कोकणात शेवगा लागवड (Shevga Cultivation) सप्टेंबर ते मार्च या कालावधीत करता येते, तर महाराष्ट्रातील इतर भागात लागवड जून ते जानेवारी महिन्यात केव्हाही केली तरी चालते.

शेवग्याच्या सुधारित जाती (Shevga Varieties)

तमिळनाडू कृषी विश्वविद्यालय, कोइमतूर यांनी प्रसारित केलेले कोइमतूर- 1, कोइमतूर -2, पी.के.एम.- 1 आणि पी. के. एम.-2  हे वाण लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण आहेत.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी ‘कोकण रुचिरा’ हे वाण प्रसारित केले आहे.

तर  बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापीठाने ‘भाग्या’ (K.D.M.-01) ही जात चांगल्या उत्पादनासाठी विकसित केली आहे.

याव्यतिरिक्त जाफना, रोहित 1, ओडिसी, दत्त शेवगा कोल्हापूर, शबनम शेवगा, जी.के.व्ही.के. १, जी.के.व्ही ३, चेन मुरिंगा, चावा काचेरी यासुद्धा शेवग्याच्या जाती उपलब्ध आहेत.

लागवड पद्धती (Shevga Cultivation Method)

शेवग्याच्या व्यावसायिक लागवडीसाठी मे किंवा जून महिन्यात 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे खणावेत. त्यात 1 घमेले चांगले कुजलेले शेणखत, 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 500 ग्रॅम निंबोळी खत आणि 10 ग्रॅम दाणेदार कीटकनाशक मिसळून खड्डा भरावा. हलक्या जमिनीत दोन झाडांमधील आणि ओळींमधील अंतर 2.5 x 2.5 मीटर (640 झाडे प्रति हेक्टर) आणि मध्यम जमिनीत 3.0 x 3.0 मीटर (प्रति हेक्टर 444 झाडे) असावे.

कमी पावसाच्या भागात प्लास्टिकच्या पिशवीत बियाणे टाकून रोपे तयार केली जातात. पिशवीत माती, चांगले कुजलेले शेणखत व वाळू किंवा मुरुम 2:1:1 याप्रमाणे मिश्रण तयार करुन त्यामध्ये थोडी ट्रायकोडर्मा पावडर टाकावी.

बीजप्रक्रिया (Seed Treatment): 1 लिटर पाण्यात 25 मिली जर्मिनेटर किंवा कोमट पाणी व त्यामध्ये बावीस्टीन किंवा थायरमचा वापर शिफारशीप्रमाणे करून या द्रावणात बी टाकून काठीने ढवळून ते रात्रभर भिजवून त्यावर झाकण ठेवावे. दुसऱ्या दिवशी हे बी प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा पोत्यावर अंथरूण सावलीत सुकवावे व नंतर भरलेल्या पिशवीच्या मधोमध ते लावावे. शेवग्याचे बी पिशवीत लावल्यानंतर एक महिन्याच्या आत लागवड होईल याची काळजी घ्यावी लागते.

आंतरमशागत व खत व्यवस्थापन (Interculture And Fertilizer Management)

झाडांची आळी वेळोवेळी खुरपून तण काढून स्वच्छ करावीत. दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाईल.

प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस 10 ते 15 किलो शेणखत, 75 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद व 75 ग्रॅम पालाश याप्रमाणे रासायनिक खतमात्रा द्यावी. संपूर्ण शेणखत रोप लावताना द्यावे व पुढे प्रतिवर्षी छाटणी केल्यानंतर द्यावे. तसेच सर्व खते वर्षातून 4 वेळा विभागून द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रत्येक वेळेस 5 किलो शेणखतात मिसळून द्यावे

छाटणी (Pruning)

शेवग्याचे झाड फार उंच वाढल्यास शेंगा काढणीस अवघड होते यामुळे झाडाची वेळोवेळी छाटणी करणे गरजेचे आहे. लागवडीनंतर 2 ते 2.5 महिने किंवा मुख्य खोड 3 ते 4 फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून 1 मीटर अंतरावर छाटावे. चार दिशांना चार फांद्या वाढू द्याव्यात. यामुळे झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाते. त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी चारही फांद्या मुख्यः खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्यः आराखडा तयार होण्यास मदत होते. तसेच झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे होते. त्यानंतर पुढे दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी. म्हणजे झाड नियमित उत्पादन देते.

काढणी व उत्पादन (Harvesting)

लागवडीनंतर (Shevga Cultivation) सुमारे 6 ते 7 महिन्यांनी शेंगा काढणीसाठी तयार होतात. सहा सात महिन्यानंतर प्रत्येक हंगामात एक चांगल्या झाडापासून सुमारे 25 ते 50 किलो शेंगा मिळतात.

error: Content is protected !!