Siddheshwar Dam : येलदरीतून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जायकवाडी धरणाव्यतिरिक्त पूर्णा नदीवरील येलदरी, सिद्धेश्वर ही दोन मराठवाड्यातील महत्वाची धरणे (Siddheshwar Dam) आहेत. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या या दोन्ही धरणामुळे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह अन्य आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. अशातच आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून येलदरीतून दररोज 4 दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात (Siddheshwar Dam) सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आजच्या घडीला येलदरी धरणात 54.53 टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी येलदरी धरण याच कालावधीत 98.73 टक्के इतके भरलेले होते. तर सिद्धेश्वर धरणात (Siddheshwar Dam) सध्या 34.52 टक्के इतका पाणीसाठा आहे. एकूणच परिस्थिती पाहता सध्या सिद्धेश्वर धरणाची खालावलेली पाणीपातळी पूर्वपदावर आणण्यासाठी वरील येलदरी धरणातून हे पाणी सोडले जात आहे. त्यानुसार सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

60 हजार हेक्टरवरील पिकांना फायदा (Siddheshwar Dam Water released From Yeldari)

दरम्यान, याआधीच सिद्धेश्वर धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन देण्यात आले आहे. त्यात आता येलदरी धरणातून सोडल्या जाणाऱ्या या आवर्तनामुळे नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील 60 हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. कारण सिद्धेश्वर धरणामधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्याद्वारे शेतीसाठी दुसऱ्या आवर्तनाचे पाणी सोडण्यासाठी स्थानिक जलसंपदा विभागाकडून नियोजन सुरु असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या या पाण्याच्या माध्यमातून दोन संचांद्वारे जल विद्युत निर्मितीही केली जात असून, त्यातून वीजनिर्मितीसही फायदा होणार आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करावा

सध्या हिंगोली जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रब्बी पिके अंतिम टप्प्यात तर उन्हाळी पिकेही जोमात असून, धरणाची पाणीपातळी वाढल्यास या पिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. येलदरी धरणात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणी असूनही आवर्तन सोडले जात असून, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात ठिबकवर काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!