हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोलापूरचे ग्रामदैवत ‘श्री सिद्धेश्वर महाराज’ यांची यात्रा (Sonya Bail) सुरू आहे. या यात्रेनिमित्त ‘श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन’ भरवण्यात आले असून, या प्रदर्शनात खिलार जातीचा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याची 41 लाख ही किंमत आणि त्याचा खाण्यापिण्यावरील रोजचा खर्च ऐकून तुम्हीही चाट पडल्याशिवावाय राहणार नाही. सोन्या बैलाला (Sonya Bail) पाहण्यासाठी सध्या या प्रदर्शनात एकच गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रदर्शनात सोन्याचीच हवा (Sonya Bail Worth 41 Lakhs)
महाराष्ट्र सरकार, सिद्धेश्वर देवस्थान पंच समिती आणि जिल्हा परिषदेच्या वतीने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास तीस एकरात हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतीसाठीची आधुनिक अवजारे, विविध पीके, फळे या सोबतच पशुधन देखील पाहायला मिळत आहे. मात्र या सर्वांमध्ये 41 लाखांचा खिलार जातीचा सोन्या बैल हा येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोन्या बैलाचे वय केवळ 5 वर्ष इतके आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी गावचे डॉ.विद्यानंद अवटी हे सोन्या बैलाचे मालक आहे.
खुराकवरील दररोजचा खर्च
सोन्या बैल (Sonya Bail) हा देशातील सर्वात उंच आणि देखणा खिलार जातीचा बैल असल्याचा दावा त्याचे मालक विद्यानंद अवटी करतात. सोन्याची उंची 6.5 फूट तर लांबी 8. 5 फूट इतकी आहे. सोन्याचा ज्या पद्धतीने रुबाब आणि थाट आहे. अगदी त्याच पद्धतीने त्याचा खुराकही दणकट आहे. त्याचा दररोजचा खुराक मात्र एखाद्या पैलवानापेक्षाही अधिक असल्याचे त्याचे मालक डॉ.विद्यानंद अवटी सांगतात. सोन्याला दिवसातून दोन लिटर गीर गाईचे दूध, सात ते आठ अंडी, करडई तेल 200 मिली दिले जाते. याशिवाय दररोज आहारात दोन वेळा वैरण आणि सात प्रकारचे कडधान्यांचे खाद्य दिले जातात. इतकेच नाही तर सोन्याला दररोज गरम पाणी आणि शांम्पूने अंघोळ देखील घातली जाते. सोन्या अतिशय शांत स्वभावाचा असून, एक माणूसही त्याला हाताळू शकतो.
शेतकरी व सोन्याचे मालक डॉ.विद्यानंद अवटी हे आपल्या या सोन्या बैलापासून उत्तम ब्रीड तयार करतात. सोन्या बैलापासून तयार होणारे वासरू देखील उंच आणि देखणे तयार होते. साध्या बैलाचे वासरू हे सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा हजारापर्यंत विकले जाते. मात्र सोन्याच्या ब्रीडपासून तयार झालेले वासरू हे वासरू सव्वा लाखापर्यंत विक्री होत असल्याचे ते सांगतात. सोन्या केवळ पाच वर्षांचा असून, त्याला बाजारभावाप्रमाणे 41 लाखांची किंमत मिळत आहे. मात्र त्याला कोटींमध्ये किंमत मिळाली तरी आपण त्याला विकणार नसल्याचे मालक व शेतकरी डॉ.विद्यानंद अवटी सांगतात.