Success Story : कांद्याचा नाद सोडला, केळी पिकातून लासलगावच्या शेतकऱ्याची 28 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Success Story) गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या आठमुठ्या धोरणाचा मोठा फटका बसतोय. बाजारात ऐन शेतकऱ्यांचा माल येण्यास सुरुवात झाली की सरकारकडून निर्यातबंदी करून भाव पाडले जातात. मात्र सरकारच्या याच धोरणाला कंटाळलेल्या लासलगाव येथील एका शेतकऱ्याने चक्क पाच एकरात केळीची बाग फुलवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेतात पिकलेली केळी अरब देशांमध्ये निर्यात केली जात आहे. सध्या त्यांच्या बागेची काढणी सुरु असून, त्यांना पाच एकरातील केळी पिकातून 27 ते 28 लाखांचे उत्पन्न मिळणार (Success Story) असल्याचे ते सांगतात.

लासलगाव म्हटले की कांदा उत्पादक शेतकरी असे समीकरण बनले आहे. मात्र, लासलगावजवळील पाचोरे खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी तानाजी आंधळे यांनी सरकारच्या कांदा निर्यात धोरणाला कंटाळून आपल्या पाच एकर शेतीमध्ये केळीची बाग लावली आहे. कांदा पिकाला कष्ट घेऊन, गुणवत्तापूर्ण माल पिकवूनही दर मिळत नव्हता. म्हणून शेतकरी तानाजी आंधळे यांना वेगळे पीक घेण्याची कल्पना सुचली. यातूनच त्यांच्या मनात केळी लागवडीची कल्पना आली.

जळगावहून मागवली रोपे (Success Story Of Banana Farmers)

केळी लागवड करण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी जळगाव येथून जैन इरिगेशनच्या (Success Story) ‘टिशू पेपर कल्चर ग्रँड नाइन’ जातीची 6 हजार केळीची रोपे मागवली. 26 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी या रोपांची आपल्या पाच एकर क्षेत्रात लागवड केली. आठ बाय चार या अंतरावर दीड फुटाच्या बेडवर त्यांनी केळीची लागवड केली. यासाठी त्यांनी ठिबकची व्यवस्था केली असून, त्याद्वारे ते केळी पिकाला पाण्यासह, खते (सूक्ष्म अन्नद्रव्ये) देखील देतात.

किती मिळाले उत्पन्न?

केळीचे उत्पादन मिळण्यासाठी एक वर्षांचा कालावधी लागत असल्याने त्यांनी मागील वर्षभरात केळी पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले. यंदा त्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघाला नाही, असे शेतकरी तानाजी आंधळे यांनी सांगितले आहे. मात्र आपण निराश न होता, आपल्या मुख्य केळी पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. एका झाडाला यावर्षी जवळपास 37 ते 38 किलोंचे केळीचे घड आपल्याला मिळाले आहे. पहिली तोडणी केली तेव्हा 26 टन माल निघाला, आता दुसरा तोडा सुरु असून, त्यात 50 ते 55 टन माल निघाला आहे. आणखी काही केळी शिल्लक असून, असे एकूण यावर्षी 150 ते 155 टन केळीचे उत्पादन होणार आहे. या केळी पिकाला आपल्याला साडेसात लाख रुपये इतका खर्च आला आहे. उत्पादन खर्च वजा करून, 27 ते 28 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकरी तानाजी आंधळे यांनी सांगितले आहे.

कुठे होतीये विक्री?

शेतकरी तानाजी आंधळे आपली उत्पादित सर्व केळी अरब देशांमध्ये पाठवत आहेत. कांदा पिकाला बियाण्यापासून, लागवड ते काढणीपर्यंत मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे कांद्यापेक्षा केळी पीक बरे आहे. लागवडीसाठी खर्च होतो पण एक निश्चित उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत, पिकांमध्ये विविधता आणण्याची गरज निर्माण झाली आहे. असे शेतकरी तानाजी आंधळे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!