हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात केळीला मोठी मागणी असते. भारतात प्रामुख्याने (Success Story) तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक केळीची शेती केली जाते. मात्र आता उत्तरप्रदेशातील एका शेतकऱ्याने केळी लागवडीचे एक असे मॉडेल (Success Story) विकसित केले आहे. ज्याची प्रेरणा घेऊन युपीतील शेतकरी जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर केळी लागवड करत आहे. इतकेच नाही तर या शेतकऱ्याला सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील या शेतकऱ्याचे नाव राम सरण वर्मा असून, ते मागील 32 वर्षांपासून केळीची शेती (Success Story) करत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि बंगलोर येथील शेतकऱ्यांच्या केळी शेतीला भेट देऊन, माहिती मिळवली. या 32 वर्षाच्या काळात त्यांनी आतापर्यंत 100 ते 125 एकरात केळीची शेती फुलवली आहे. ते आपल्या शेतीमध्ये नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांचे अनुकरण करत आज युपीतील जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी केळी शेतीची वाट धरली आहे. त्यामुळे जवळपास 30 हजार शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राम सरण वर्मा यांच्या याच कामाची दखल घेत, केंद्र सरकारने 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.
सुयोग्य नियोजनातून यश (Success Story Of Banana Man)
उत्पादनात घट होऊ नये म्हणून राम सरण वर्मा केळी लागवडीचा विशिष्ट काळ (15 जून ते 15 जुलै) सांभाळतात. दोन झाडांमध्ये 6 बाय 6 इतके अंतर ठेवतात. या हिशोबाने एकरात 1200 रोपांची लागवड करतात. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी हे अंतर त्यांना अनुभवातून उमगले आहे. याशिवाय G-9 या केळीच्या जातीच्या रोपांची लागवड करतात.
माती परीक्षण
केळीच्या शेतीसाठी वालुकामय चिकणमाती खूप उपयुक्त असते. तसेच या मातीचा पीएच 6.5 ते 7 टक्के इतका असावा. जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. केळी पिकाला पाणी पाट-वाफा पद्धतीने न देता केवळ ड्रीपच्या माध्यमातून द्यावे. शेणखताच्या वापरातून केळी पिकातून मोठे उत्पन्न मिळते, हे त्यांच्या अनुभवातून समोर आले आहे.
किती मिळते एकरी उत्पादन
एका एकरात 1200 केळीची झाडे लावली असतील तर त्यापासून 350 ते 400 क्विंटल उत्पादन मिळते. त्यामुळे ते म्हणतात, केळीला 10 रुपये किलोचा दर मिळाला तरीही एकरात 4 लाखांचे उत्पन्न मिळते. यामध्ये 20 ते 25 टक्के उत्पादन खर्च झालेला असतो. त्यामुळे एकरी 3 ते 4 लाख उत्पादन हमखास मिळते.