Success Story : नोकरीपेक्षा शेतीच भारी; शिमला मिरची लागवडीतून साधली आर्थिक उन्नती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी वर्ग शेतीला कंटाळला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण (Success Story) घेऊन नोकरी करण्यासाठी परावृत्त करत आहेत. मात्र काळाच्या ओघात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे याच उच्चशिक्षित शेतकरी पुत्रांनी आपल्या शिक्षणाचा वापर आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह पीक पद्धतीत बदल करत शेतीत केल्यास नोकरीपेक्षा अनेक पटीने पैसा (Success Story) कमावला जाऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अजित चंद्रशेखर खांडगौरे या उच्चशिक्षित तरुणाने शिमला मिरचीच्या शेतीतून हे सिद्ध करून दाखवले आहे. आज आपण अजित यांच्या शिमला मिरची लागवडीची यशोगाथा पाहणार आहोत.

अजित खांडगौरे यांनी उच्चशिक्षण घेत नोकरीसाठी धडपड सुरु केली. मात्र पाठीशी शेतीचा वसा असल्याने वारंवार अजितला शेतीत काहीतरी नवीन करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीला अजित आपल्या शेतीत पारंपरिक पद्धतीने पिके घेत असत. मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अजितने शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा निर्धार केला. पहिल्या प्रयत्नात शिमला मिरचीला असलेल्या कमी बाजारभावामुळे त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र यावर्षी समाजमाध्यमांचा आधार घेत, अजितने कृषी तज्ज्ञांकडून माहिती मिळवत शिमला मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. जोडीला गांडूळ खत निर्मिती प्रकल्पही उभारला आहे.

शिमला मिरचीला काकडीची जोड (Success Story Of Capsicum Cultivation)

अजित यांची वडीलोपार्जित 3 एकर माळरान जमीन असून, त्यांनी सध्या एक एकरात शेडनेटच्या माध्यमातून शिमला मिरचीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी प्लेडियन जातीच्या शिमला रोपांची निवड केली असून, एकरी 15 हजार रोपे लावली आहेत. तर अन्य एक एकरात शेडनेट माध्यमातून त्यांनी काकडी लागवडीची तयारी सुरु केली आहे. मात्र अजित सांगतात, शिमला मिरचीची लागवड केल्यानंतर पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा बुरशीजन्य कीटक व थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित पिकावर लक्ष ठेवत फवारणी करावी लागते.

किती मिळतोय दर?

लागवडीनंतर जवळपास 45 दिवसांनी अजित यांची शिमला मिरची काढणीला (Success Story) आली असून, नाशिक आणि पनवेल येथील व्यापारी स्वतः बांधावर येऊन आपली मिरची खरेदी करत असल्याचे अजित सांगतात. आपल्या शेतात सध्या दर आठ दिवसाला तोडा केला जात असून, प्रति तोडा 2 ते 3 टन उत्पादन मिळत आहे. बांधावर येऊन खरेदी करणारे व्यापारी सध्या आपल्या शिमला मिरचीला 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर देत आहे. प्रति किलोसाठी सरासरी 15 रूपयांचा खर्च वजा जाता, बाजारभावातील कमी-जास्तपणामुळे वार्षिक निव्वळ 3 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न आपल्याला शिमला मिरची लागवडीतून मिळत असल्याचे अजित खांडगौरे सांगतात.

गांडूळ खत निर्मिती

अजित यांनी आपल्या पिकांना योग्य खत पुरवठा करण्यासाठी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून, यामध्ये जवळपास त्यांनी 12 बाय 4 आकाराचे एकूण 20 बेड उभारले आहेत. यासाठी ते शेणखत विकत घेऊन, त्यात मकाच्या चाऱ्याची कुट्टीचे थर देत गांडूळ खत निर्मिती करत आहेत. जवळपास 3 ते 4 महिन्याच्या कालावधीनंतर हे खत तयार होऊन, पिकांना उपलब्ध होत असल्याचे अजित सांगतात.

error: Content is protected !!