Success Story : बारमाही ऊस पिकाला फाटा; शेतकऱ्याने पपई पिकातून मिळवले लाखोंचे उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊस शेतीसाठी (Success Story) ओळखला जातो. मात्र, बारमाही ऊस शेतीला फाटा देत वाणेवाडी येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखोंचा फायदा मिळवला आहे. दरवर्षी ऊस पिकावर ऊस पीक घेतल्याने शेतीचा पोत खराब होत चालला आहे. त्यात शेती पिकाला असलेला अनिश्चित दर, त्यामुळे बागायती पट्टयातील शेतकरी हा नविननवीन प्रयोग राबवत असतो. वाणेवाडीचे दिग्विजय धन्यकुमार जगताप यांना ऐकून ४५ एकर जमीन आहे. त्यातील साडेचार एकरावर जगताप यांनी पपई शेतीचा प्रयोग (Success Story) राबविला आहे.

15 नंबर जातीच्या रोपांची निवड (Success Story Papaya Farming)

सुरुवातीला २०२२ ला त्यांनी दोन एकर क्षेत्रावर पपई लागवड (Success Story) करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परंडा येथून १५ नंबर जातीचे अडीच हजार पपईचे रोप विकत आणले. तत्पूर्वी शेणखत खालून नांगरणी-काकरणी करून बेड वाफे तयार केले. बेड तयार करताना त्यामध्ये बेसल डोस भरले, दोन रोपातील अंतर ७ बाय ८ ठेवले. सात महिन्यापर्यंत रोपांना ठिबकद्वारे १९-१९, १२-६१ तसेच कॅल्शियम नायट्रेट अशी खते सोडली. दर पंधरा दिवसाला खते व औषध फवारणी केली. सातव्या महिन्यात प्रत्येक्ष फळ तोडणीला सुरवात झाली.

दोन एकरातून वार्षिक 80 टन उत्पादन

पहिल्यांदा एक किलोला चांगला दर मिळाला दिवाळीनंतर मात्र काहीसा दर कमी झाला. मात्र, पपई हंगाम संपेपर्यंत सरासरी किलोला २५ रुपये दर मिळाला. जगताप यांची सध्या दोन एकर पपई सुरू असून, अडीच एकर नवीन पपई रोपांची लागवड केली आहे. एकदा पीक लावल्यानंतर ते तीन वर्षे फळ देते. जगताप यांनी दोन एकरातून वर्षाला ८० टन पपईचे उत्पादन घेतले आहे. ज्यातून त्यांना लाखोंचा नफा मिळाल्याचे ते सांगतात.

रोगांपासून बचाव महत्वाचा

ऊस शेतीला बारमाही पाणी व भरमसाठ खतांचा खर्च करावा लागतो. त्या तुलनेने अत्यंत कमी पाणी आणि कमी खर्चात पपई हे पीक घेता येते. कमी खते, कमी औषधे तसेच कमी मजुरात पपई पिकाचा उत्पादन खर्च कमी होतो. पपईला दर चांगला मिळाला तर शेतकऱ्यांना निश्चितच उभारी देणारे हे पीक आहे. मात्र, रोगांपासून पपई पिकाला खूप जपावे लागते. असे शेतकरी दिग्विजय जगताप यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!