Success Story : धान पिकाचा नाद सोडला, पेरू बाग लावली; करतोय वर्षाला लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा फळबाग शेतीकडे (Success Story) ओढा वाढला आहे. अनेक शेतकरी पारंपारीक पिकांना मूठमाती देत, आधुनिक पद्धतीने फळबाग शेतीकडे वळत आहेत. अशातच आता राज्याच्या अतिपूर्वेकडील भंडारा जिल्ह्यातही अनेक शेतकरी भाजीपाला व फळबागांची लागवड करताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेलया देव्हाडी गावातील प्रगतीशील शेतकरी अरुण मुटकुरे यांनी देखील असाच काहीसा प्रयोग केला असून, त्यांनी पेरू बागेतून एक वर्षभरात तब्बल दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आज आपण अरुण मुटकुरे यांची पेरू बागेची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

कोणत्या वाणाची निवड (Success Story Guava Farming Bhandara)

भंडारा जिल्हा म्हटले की आठवते ते धानाची शेती. मात्र सध्या कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसाअभावी या भागातील शेतकऱ्यांना धान पिकातून नुकसान सोसावे लागते. यावर उपाय म्हणून देव्हाडीचे शेतकरी अरुण मुटकुरे यांनी पेरू लागवड (Success Story) करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्वप्रथम त्यांनी पेरू लागवडीबाबत माहिती मिळवली. इतकेच नाही तर प्रसंगी स्थानिक कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये धानाच्या शेतीचा नाद सोडत, आपल्या दीड एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली. यासाठी त्यांनी व्ही.एन.आर. पेरू वाणाची जवळपास सातशे पेरू रोपे उपलब्ध करून, नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी त्यांची लागवड केली.

किती मिळतंय उत्पन्न?

मागील पाच वर्षांपासून त्यांनी आपली पेरू बाग जपली असून, त्यांना लागवडीसाठी पहिल्या वर्षी 5 लाख रुपये इतका खर्च आला होता. मात्र मागील काही वर्षांपासून आपण पेरू लागवडीत प्रभावी उत्पन्न मिळवत असून, यावर्षी आपल्याला दीड एकरातील सातशे पेरू झाडांपासून बाजारभावानुसार दहा लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले असल्याचे शेतकरी अरुण मुटकुरे सांगतात. पेरू बागेसाठी आपण वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत असून, ज्याचा आपल्याला खूप फायदा होत असल्याचे ते सांगतात.

शेतीमध्ये प्रयोगशीलता महत्वाची

यापूर्वी पारंपारिक पद्धतीने धान पिकाची लागवड करायचो. मात्र वातावरणातील बदल तसेच पावसाची अनिश्चितता यामुळे आपल्याला धान पिकातून नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे शेतीमध्ये वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. आणि त्यात आपण पूर्णतः यशस्वी ठरल्याचे शेतकरी अरुण मुटकुरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या नादाला न लागता शेतीमध्ये काही वेगळे बदल करता येतात का? काही नवीन पिकातून अधिक उत्पन्न घेता येऊ शकते. असे सतत प्रयोग करत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!