हॅलो कृषी ऑनलाईन : स्वतःवर विश्वास असला की कोणत्याही कामात यश (Success Story) मिळवता येते. या विश्वासाला जिद्द आणि कष्ट यांची जोड मिळाली की अशक्य असे काहीच नसते. मग कष्टातून एखाद्या झोपडीतूनही नंदनवन फुलवता येते. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी तरुण रायसिंग वसावे याने हे सिद्ध करून दाखवले आहे. रायसिंग याने आपल्या झोपडीतून मशरूम शेती करणे सुरु केले असून, तो सध्या महिन्याकाठी त्यातून भरघोस उत्पन्न मिळवत आहे. विशेष म्हणजे या मशरूम शेतीसाठी (Success Story) त्यांना अत्यंत कमी खर्च आला आहे.
300 रुपये किलो दर (Success Story Mushroom Farming From Hut)
मशरूम शेती म्हटले की मोठे सुसज्ज शेड आणि अधिकचा खर्च हा समज आजकाल दिसून येतो. त्यातच शेतीतील जोडधंद्यांच्या भांडवल उभारणीसाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. आणि त्यातूनही भांडवल उपलब्ध न झाल्यास अनेक जण मशरूम शेती किंवा अन्य जोडधंदा करण्याचा विचार मनातून काढून टाकतात. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील रायसिंग वसावे या तरुणाने जिद्द न सोडता योग्य नियोजन करत आपल्या झोपडीवजा घरातूनच मशरूम शेतीचे युनिट सुरु केले आहे. सध्या त्यांना मशरूम शेतीतून उत्पादन मिळणे सुरु झाले असून, ते प्रति किलो 300 रूपये दराने आपल्या मशरूमची विक्री बाजारात करत आहेत.
केवळ तीन हजारांचा खर्च
विशेष म्हणजे त्यांना मशरूमचे युनिट (Success Story) सुरु करण्यासाठी केवळ तीन हजार रुपये इतका खर्च आला आहे. त्यांनी आपल्या 10 बाय 20 फुटाच्या झोपडीवजा घरातच मशरूम उत्पादनासाठी बेडची निर्मिती केली आहे. या बेडवर रायसिंग यांनी शेतातील कापसाच्या पऱ्हाट्या, भाताचे काड, गव्हाचा भुसा, सोयाबीनचे काड, गवत, उसाचे पाचट आदी बरेच पिकांचे टाकाऊ अवशेष वापरून आपले हे मशरूम उत्पादनाचे छोटे युनिट सुरु केले आहे. त्यासाठी त्यांना केवळ तीन हजार रुपयांचा खर्च आला असून, योग्य व्यवस्थापनातून दोन महिन्यांमध्येच त्यांना मशरूम उत्पादन मिळणे सुरु झाले आहे.
योग्य व्यवस्थापन गरजेचे
मशरूम म्हणजेच आळिंबीचे उत्पादन घेण्यासाठी योग्य व्यवस्थापन हीच यशाची गुरूकिल्ली असते, असे रायसिंग सांगतात. बेड तयार करण्यासाठी काड भिजवण्यासह त्याचे निर्जंतुकीकरण करणे, बी पेरणे, काड भरलेल्या पिशव्या अंधार खोलीत ठेवणे, मशरूम वाढीसाठी योग्य ती आर्द्रता कायम राखणे, तयार झालेल्या मशरूमची काढणी करणे आणि साठवणूक करणे या सर्व गोष्टी रायसिंग यांनी शिकून घेतल्या आहेत. ते आता आपल्या याच माहितीचा उपयोग सातपुड्याच्या दुर्गम भागातील तरूणांना मशरुम शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी करत आहेत. तरुणांनी पारंपारिक शेतीऐवजी मशरूम शेतीकडे वळावे, असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.