Success Story : एकरात 7 ते 8 लाखांची कमाई; ड्रॅगन फ्रूट लागवडीतून शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अल्प-भूधारक शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो (Success Story) कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे? कोणत्या पिकातून आपल्याला उचित नफा मिळू शकेल? एखाद्या पिकासाठी केलेला उत्पादन खर्च मिळेल का? असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील बाबासाहेब लांडगे या अल्प-भूधारक शेतकऱ्याने अशा प्रश्नांचा विचार न करता ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. केवळ एकरभर शेती असताना त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून, त्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न (Success Story) मिळत आहे.

शेतकरी बाबासाहेब लांडगे (Success Story) हे दहेगाव बोलका या गावाचे रहिवासी असून, त्यांच्याकडे केवळ एक एकर आठ गुंठे शेती आहे. मात्र त्यांनी मका, सोयाबीन, ऊस या पारंपरिक पिकांना फाटा देत ड्रॅगन फ्रूट फळाची शेती करणे सुरु केले आहे. त्यांच्या गावाजवळून गोदावरी नदीचा कालवा जातो. मात्र या कालव्याला बारमाही पाणी राहत नसल्याने ते कोरडवाहू पिके घेत होते. त्यातून त्यांना जेमतेम उत्पन्न मिळत होते. पारंपरीक पिकांतून उत्पन्नाची हमी नसते. त्यामुळे त्यांनी शेतीत काहीतरी नवीन करायचा निर्धार मनाशी बाळगला. याच निर्धारातून त्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीविषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमांवर त्यांनी याबाबत बरीच माहिती मिळवली.

‘रेड-रेड’ जातीची निवड (Success Story Of Dragon Fruit Farming)

ड्रॅगन फ्रूट लागवडीबाबत योग्य ती माहिती मिळवल्यानंतर त्यांनी कोलकाता येथून ‘रेड-रेड’ या जातीच्या ड्रॅगन फ्रुटची रोपे मागवली. सुरवातीला शेतकरी बाबासाहेब लांडगे यांनी 10 गुंठे जमिनीमध्ये 8 फूट बाय 10 फुटावर या रोपांची लागवड केली. त्यात त्यांना उत्तम यश आले. हे पाहता त्यांनी आपल्या आठ गुंठे जमिनीत शेततळे उभारले. ज्यामुळे त्यांना बारमाही पाण्याची सोय उपलब्ध झाली. योग्य ते पाणी नियोजन करत त्यांनी आता उर्वरित एक एकर रानात संपूर्ण ड्रॅगन फ्रूट फळाची लागवड केली आहे.

खत व्यवस्थापन

शेतकरी बाबासाहेब लांडगे यांनी आपल्या 10 गुंठ्यात केलेली ड्रॅगन फ्रूटची लागवड आज एक एकरवर बहरली आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण एकरासाठी ड्रॅगन फ्रूटला वार्षिक 4 ते 5 ट्रॉली शेणखत तसेच सेंद्रिय कंपोस्ट खत दिले आहे. रासायनिक खतांचा वापर त्यांनी पूर्णतः टाळला आहे. ते नियमितपणे वेळेनुसार आपल्या बागेची छाटणी करतात. याशिवाय वर्षातून एकदा किंवा दोनदा बुरशीनाशक फवारणी करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेडनेटचा वापर केलेला आहे.

किती मिळाले उत्पन्न?

लांडगे यांना दरवर्षी एकरी सरासरी 10 ते 11 टन ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन मिळते. त्यांच्या फळाचा आकार आणि गुणवत्तेनूसार त्यांना 70 ते 200 रुपये प्रति किलोंपर्यंतचा दर मिळतो. ते आपल्या ड्रॅगनची विक्री ही थेट बांधावर करतात. तर काही ड्रॅगन ते विक्रीसाठी नाशिकला पाठवतात. यातून त्यांना वार्षिक 8 ते 10 लाखांचे उत्पन्न मिळते. त्यातून खर्च वजा जात त्यांना 7 ते 8 लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहतो. याशिवाय ते आपल्या ड्रॅगनच्या छाटणी केलेल्या फांद्यांमधूनही लागवड करण्याजोग्या रोपांची निर्मिती करून ते 15 ते 20 रुपये दराने विक्री करतात. त्यातूनही त्यांना अतिरिक्त कमाई होते.

error: Content is protected !!