हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीकडे (Success Story) वळत आहेत. त्यामुळे पिकांमध्ये विविधता येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर देखील मिळत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बारमाही पाणी असलेल्या एका शेतकऱ्याने ऊस पिकाऐवजी शेवंती लागवड करत, फुल शेतीची वाट धरली. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने शेवंतीच्या फुल शेतीतून भरघोस कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उसासारख्या अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाला फाटा देत, शेतकरी अन्य पिकांमधुन अधिक कमाई करत असल्याच्या अनेक यशोगाथा (Success Story) समोर येत आहे.
बंगळुरूहुन केली रोपे उपलब्ध (Success Story Of Flower Farming)
शेतकरी शेखर मोरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, दौंड तालुक्यातील देशमुख मळा येथे त्यांची शेती आहे. पारंपरिक ऊस पिकाला कंटाळलेल्या मोरे यांनी शेवंती लागवडीचा (Success Story) निर्णय घेतला. शेवंती लागवडीसाठी त्यांनी बंगळुरू येथून 36000 रोपे उपलब्ध केली. महाराष्ट्रातील हवामानाला अनुकूल असलेली बंगळुरूमधील अधिक फुलांचे उत्पादन देणारी ही रोपे त्यांनी मित्राच्या मदतीने उपलब्ध केली. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी त्यांनी आपल्या शेतात शेवंतीची लागवड केली. शेवंती लागवडीसाठी त्यांनी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. ज्यामुळे त्यांच्या शेवंतीला मूळकूज होण्याचा धोका उद्भवला नाही.
कमी पाण्यात अधिक उत्पन्न
ऊस शेती म्हटले की पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते. नियमित पाणी असेल तर उसाच्या उत्पादनात वाढ होते. मात्र शेवंतीच्या फुलशेतीला अधिक पाण्याची गरज आपल्याला भासली नसल्याचे शेतकरी शेखर मोरे सांगतात. याशिवाय फुल शेतीसाठी आपण ठिबक सिंचनद्वारे झाडांना पाण्याची उपलब्धता करून दिली. ज्यामुळे अल्प पाण्यात अधिक उत्पन्न आपल्याला मिळत असल्याचे ते सांगतात. आपल्याकडे पाण्याची कमतरता नाही, मात्र तेच तेच ऊस पीक घेऊन ऊस उत्पादनात मोठी घट झाल्याने आपण पीक पद्धतीत बदल केल्याचे ते सांगतात.
किती मिळतोय दर?
शेतकरी मोरे यांनी स्थानिक बाजारात शेवंती फुलांची विक्री न करता, ते आपली सर्व फुले मुंबई येथील बाजार समितीत पाठवतात. त्यांना त्या ठिकाणी प्रति किलोसाठी सरासरी 120 ते 140 रुपये प्रति किलोचा दर मिळत असून, आठवड्यातून दोन वेळा ते फुलांचा तोडा करतात. विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचा सीजन असल्याने फुलांना अधिक मागणी असल्याचे ते सांगतात. शेतकरी मोरे म्हणतात, आपण त्याच-त्याच ऊस पिकाला कंटाळलो होतो. त्यामुळे प्रयोग म्हणून आपण फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्याला फुल शेतीमधून कमी खर्चात आणि कमी पाण्यात अधिक नफा मिळाला आहे.