Success Story : पारंपारिक ऊस शेतीला फाटा; पेरू बागेतून कोल्हापूरच्या शेतकऱ्याची भरघोस कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये कष्ट घेण्याची अपार क्षमता असते. ते अपयश आले तरीही ते अपयशाने खचून न जाता जोमाने (Success Story) शेतीमध्ये मेहनत करत असतात. शेतकरी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने माळरानावर देखील नंदनवन फुलवतात. याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी आणून दिला आहे. त्यांनी पेरू लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे सचिन हे आपला सर्व उत्पादित पेरू बागेतील माल परदेशात पाठवत आहेत. आज आपण शेतकरी सचिन पाटील यांच्या पेरू शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पारंपारिक शेतीला फाटा (Success Story Of Guava Farming)

कोल्हापूर जिल्ह्यातील खोची बुवाचे वाठार या परिसरात शेतकरी सचिन पाटील (Success Story) यांची जमीन आहे. सचिन हे सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करत होते. मात्र, तेच तेच पीक घेण्यामुळे जमिनीचा पोत काहीसा खालावला होता. ज्यामुळे त्यांनी शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यासह फळबाग शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पेरू या फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. अर्थात सध्या त्यांनी पेरू लागवडीचे योग्य नियोजन केल्याने त्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे.

सातशे ग्रॅमपर्यंत वजन

शेतकरी सचिन पाटील सांगतात, आपण आपल्या दोन एकरात व्हीएनआर जातीची पेरूची बाग (Success Story) उभी केली आहे. सध्या आपल्या पेरू बागेचे उत्पादन सुरु झाले असून, आपल्या बागेतील उत्पादित माल कोल्हापूर, बेळगाव तसेच परदेशात पाठविला जात आहे. आपल्याकडे उत्पादित पेरूचे वजन हे तीनशे ग्रॅमपासून सातशे ग्रॅम वजनाचे मोठे पेरू गोलाकार आकाराचे आहेत. त्यात बिया कमी असून, गर अधिक आहे. गोड स्वादिष्ट असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे ते सांगतात.

आतापर्यंत सहा लाखांची कमाई

शेतकरी सचिन पाटील सांगतात, दोन एकरात व्हीएनआर जातीची पेरूची बाग असून, आतापर्यंत सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पादन निघाले आहे. अजून महिनाभर उत्पादन सुरू राहील. आपला माल विक्री केल्यानंतर त्यापासून आपल्याला 12 दिवसांमध्ये विक्रीचे पैसे मिळतात. यंदा प्रथमच फळे आले असून, पावणेतीन लाख रुपयांचा खर्च पेरू शेतीसाठी झाला आहे. असे ते सांगतात.

पेरू बागेतून कमी पाण्यात अधिक उत्पन्न

शेतकरी सचिन पाटील सांगतात, माळरानात ऊस पीक जास्त पाणी घेते. ऊसाच्या खोडव्याच्या उत्पन्नातही कमालीची घट होते. त्यामुळे फळबाग लागवडीचा विचार केला. त्यानुसार कमी पाण्यावर येणारी पेरूची बाग केली. दोन एकरात बारा बाय आठ फूट अंतरावर 900 रोपे लावली आहेत. रोपांची वाढ चांगली येण्यासाठी खड्डे खोदून शेणखत घातले. तसेच रासायनिक खतांच्या मात्राही दिल्या. ठिबकद्वारे पाण्याची सोय केली. झाडास वजनाने जास्त असणारे पेरू मोठ्या प्रमाणात लागले. जास्त दर मिळत असल्याने आपण दुबई येथे देखील विक्रीसाठी आपला पेरू पाठविला, असेही सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!